साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक तथा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन शहरातील मुख्य मार्गावर भव्य शोभायात्रा काढून भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मलकापूर शहरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये सकाळी ६ वाजता गौरक्षण येथे गोमातेचे पूजन व चारा तसेच नैवेद्य, सकाळी १०.३० वाजता पर्यावरणपूरक स्वास्थ करीता लाभदायक व मतदान जागृती करीता भव्य सायकल रॅलीचे आयोजन दुपारी १२ वाजता जन्मोत्सव व महाआरती करण्यात येवून सायंकाळी ६ वाजता लि.भो.चांडक विद्यालयाच्या प्रांगणावरून भगवान परशुराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रा टाळ, ढोल-ताशांच्या निनादात तथा पारंपरिक वेशभुषेतील महिला व पुरूष तथा युवक-युवतींच्या भव्य उपस्थितीत शिस्तबध्द पध्दतीने काढण्यात आली. रथामध्ये भगवान परशुराम यांची प्रतिकृतिक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शोभायात्रेमध्ये काही तरुणींनी तलवारबाजी, लाठीकाठीसह आदींचे चित्त थरारक प्रात्यक्षिक करून उपस्थितांचे मने जिंकली. शोभायात्रेमध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्याकरीता जनजागृतीही करण्यात आली. तसेच सायंकाळी महाआरतीकरीता हजारोच्या संख्येत उपस्थित समाज बांधवांची पथनाट्याद्वारे शत प्रतिशत मतदानकरीता जागृती करण्यात आली. शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून भगवान परशुरामांच्या जय जयकारात निमवाडी चौक, सिनेमा रोड, बुलडाणा रोड मार्गाने चांडक विद्यालयात पोहचल्यानंतर त्याठिकाणी भगवान परशुरामजींच्या आरतीने शोभायात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
शोभायात्रेच्या मार्गावर महिलांनी सडासारवण व रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येवून भगवान श्री परशुरामाच्या मूर्तीचे ठिकठिकाणी पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेकांकडून शोभायात्रेत सहभागी असलेल्यांना थंडपेयाचे वितरण करण्यात आले. परशुराम यांच्या जयंतीचे औचित्य साधून क्रिकेट, रांगोळी, निबंध स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. शोभायात्रेच्या सुरवातीला स्पर्धांमध्ये यश संपादित केलेल्या स्पर्धकांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेत समाज बांधव तथा भक्तगण सहभागी झाले होते.
भगवान श्री परशुरामाच्या जयजयकाराने संपूर्ण मलकापूर भगवान श्री परशुमय झाले होते. तसेच शोभायात्रेतील आकर्षक सजावट जनतेचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती. यावेळी सामाजिक, राजकीय, सेवाभावी संस्थांचे अनेक जण प्रामुख्याने सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी युवा संघटन, महिला संघटन व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासन, लि.भो.चांडक विद्यालय समिती यांचे योगदान लाभले.