संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी बारटी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारतर्फे परीक्षा घेण्यात आल्या आहेत. राज्यभरात ही परीक्षा झाली आहे मात्र या परीक्षेत एक वेगळाच गोंंधळ पुढे आला.२०२३ चा हा पेपर २०१९ च्या सेट पेपरप्रमाणे असल्याचा धक्कादायक दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. म्हणजे २०१९ साली जी प्रश्नपत्रिका देण्यात आली तीच पुन्हा विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे या प्रश्नपत्रिकेत अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच होता.२०१९ मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती तोच पेपर २०२३ च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सगळ्या प्रकारावर आता विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. अशातच ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. यातून राज्य सरकारने नवा पेपर काढण्याचीही तसदी घेतली नसल्याचे पुढे आले आहे. फक्त जुना पेपर कॉपी करून २०२३ साठी पेस्ट करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता खरंच या परीक्षेचा जो निकाल लागेल त्यातून गुणवत्ता पुढे येणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
दुसरीकडे, आजचा सारथी महाज्योती आणि बार्टीच्या फेलोशिपसाठी जो पेपर घेण्यात आला तो पेपर फुटल्याचा आरोपही काही विद्यार्थ्यांनी केला आहे. पेपर हा फुटलेल्या इन्व्हलपमध्ये आला होता तसेच त्याच्यावर विद्यार्थ्यांच्या सह्यासुद्धा घेतल्या नाही. त्यामुळे हा पेपर आधीच फोडला होता असाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.