साईमत, जळगाव : प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त सर्व राज्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘मेरी माटी, मेरा देश’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली. प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योद्धाच्या समर्पणाचे स्मरण व्हावे, याकरीता ९ ते १५ ऑगस्टपर्यंत विशेष अभियान राबविणे अपेक्षित आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी, १० ऑगस्ट रोजी प्रगती शाळेत पंचप्राण शपथ घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग होता.
आपल्या राज्याची माती हातात घेऊन ही शपथ घेण्यात आली. प्रगती विद्यामंदिर शाळेत या अभियानाला लागूनच शपथ घेतांना हातात घेतलेल्या मातीला असेच कुठेही टाकून न देता एका कुंडीत त्याचे संकलन करून त्यात नवीन रोप लावण्यात आले.
यावेळी विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल म्हणाले की, देशाविषयी प्रेम असणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांत देशप्रेम जागविणे फार महत्वाचे आहे. अध्यक्षा मंगला दुनाखे यांनी देशाची भावी पिढी घडविणे हे शिक्षकांचे कर्तव्यच नाही तर जबाबदारीही आहे. तसेच सचिव सचिन दुनाखे यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यपिका संगीता गोहील, मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.