राजपूत समाजबांधवासह महिला मंडळाचा सहभाग
साईमत/पहुर, ता.जामनेर/प्रतिनिधी :
येथून जवळील पाळधी येथील समस्त राजपूत समाजाच्यावतीने धने (भुंजरिया)चा विसर्जनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये ढोलताशे, लेझीमच्या पथकाने गावातील लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यामध्ये तरुणांनी चित्तथरारक लाठीकाठी प्रात्यक्षिक करून दाखवले. भुंजरिया सण रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवशी चांगला पाऊस, चांगले पीक, आणि सुख-समृद्धीसाठी साजरा केला जातो. यावेळी उपस्थित समस्त राजपूत समाजबांधव आणि महिला मंडळ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
श्रावण महिन्याच्या अष्टमी आणि नवमीला बांबूच्या छोट्या टोपल्यात मातीचा थर टाकून गहू किंवा ज्वारी पेरली जाते. त्यानंतर त्यांना दररोज पाणी दिले जाते. श्रावण महिन्यात भुजऱ्यांना झुला देण्याची प्रथा आहे. आठवड्याभरात ही धान्य वाढतात. त्याला ‘भुंजरिया’ म्हणतात.