साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावातील अनुभूती इंटरनॅशनल स्कुल येथे सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. त्यात पहुर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील आठ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी स्पर्धेत सहा सुवर्ण पदकांची कमाई करुन दोन रौप्य पदके मिळवून चमकदार कामगिरी केली आहे.
सुवर्ण पदक प्राप्त खेळांडुमध्ये मोहिनी राऊत इयत्ता पाचवी, वृषाली पवार इ.पाचवी, श्रावणी लोहार इ.सहावी, निलेश मालकर इ.पाचवी, कार्तिक सोनवणे इ.पाचवी, वृषभ चौधरी इ.सहावी यांचा समावेश आहे. तसेच अभिमन्यू घोंगडे आणि भावेश महाजन यांनी रौप्य पदकाची कमाई केली. स्पर्धेतील सुवर्ण पदक प्राप्त खेळांडुची पुणे येथे येत्या १८ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी खेळाडू हे शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे खेळाडू आहेत. त्यांना भूषण मगरे, ईश्वर क्षीरसागर, क्रीडा शिक्षक हरीभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडुंच्या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, सचिव भगवान घोंगडे, सर्व संचालक मंडळ, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे तसेच जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, श्रीकृष्ण चौधरी, जयेश बावस्कर यांच्यासह शिक्षक, पालकांनी कौतुक केले आहे.