वाहतुकीची कोंडी फोडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे काय ? नागरिकांचा संताप सवाल !
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
जळगाव-छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफवरील पहुर जवळील वाघूर नदी पूल परिसर अनधिकृत वाहनतळ बनला आहे.पोलिसांसमोर वाहतुकीची कोंडी फोडण्याचे आव्हान उभे टाकले आहे. प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय? असा संतप्त प्रश्न सामान्य नागरिकांसह वाहन,चालकांमधून उपस्थित होत आहे.
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी मुख्य महामार्गावर होताना दिसून येत आहे. रविवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी तर चक्क पुलावरच काही नागरिकांनी आपली वाहने पार्क केल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. वाघूर नदीवर उभारलेल्या दोन्ही फुलांच्या आजूबाजूचा परिसर दुचाकी वाहनांनी व्यापून गेल्याने महामार्गावरून येणारी जाणारी वाहने तारेवरची कसरत करत मार्ग काढत आहेत. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, संबंधित ठिकाणी रविवारीही मोठ्या प्रमाणात वाहने लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाघूर नदीचा पूल परिसर यापूर्वीही धोक्याचा बनला आहे.
तसेच परप्रांतीय नागरिकांबरोबरच एका हात मजुराचाही बळी याच ठिकाणी केलेला आहे. ही सगळी वस्तुस्थिती असताना पोलीस प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर संबंधित अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सामान्य माणसाच्या जीवाची किंमत कोणालाच नाही? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शहर पत्रकार संघटनेने पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर नवीन महामार्ग पूल सुरू झाला असला तरी उर्वरित कामे मात्र अद्यापही बाकी आहेत. पादचारी पूल सुरू न झाल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, नागरिक महिला मोठ्या संख्येने पूल परिसरातून ये-जा करत असतात. त्यामुळे पादचारी पूल सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपूर्ण अवस्थेतील काम सुरू असल्याचा बनाव?
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी बॅरिकेट लावून काम सुरू केले. मात्र, दोनच दिवसात बॅरिकेट काढून केवळ मलमपट्टी करत पुन्हा वाहतूक सुरू केल्याने अपूर्ण अवस्थेतील काम सुरू असल्याचा बनाव का करण्यात आला? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित होत आहे.