६७ बालकवींनी सादर केल्या कविता
साईमत/पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी
दिवंगत बालकवयित्री ज्ञानेश्वरी भामेरे हिच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ज्ञानवेद प्रबोधिनीतर्फे महात्मा फुले शिक्षण संस्थेत खुल्या बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ६७ बालकवी – कवयित्रींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाल साहित्यिक पी.टी.पाटील होते. यावेळी बालकवयित्री रूपाली माळी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी संताजी जगनाडे महाराज, संत रोहीदास महाराज व बालकवीत्री ज्ञानेश्वरी भामेरे यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. बालवयात शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहित्य अभिरुची निर्माण व्हावी, या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यात ‘आई ‘, ‘बाबा’, ‘शाळा’, ‘निसर्ग’, ‘शेतकरी’, ‘शिवाजी महाराज’, ‘भिडेवाडा’, ‘सावित्रीमाई’, ‘भाऊ ‘ अशा विविध विषयांवर बालकवींनी आपल्या कविता सादर केल्या. सर्व सहभागी बालकवींना संमेलनाचे अध्यक्ष पी.टी. पाटील यांच्यातर्फे ‘किलबिल’ बालकाव्यसंग्रह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, अजय देशमुख, भगवान जाधव, अमोल क्षिरसागर, किरण पाटील, विद्या पवार, तुकाराम जाधव, तुषार बनकर, ईश्वर हिवाळे, निळकंठ महाराज आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचालन गायत्री पवार व प्रणिता क्षीरसागर यांनी केले. ज्ञानवेद प्रबोधिनीच्या उपाध्यक्षा कल्पना बनकर, सचिव हरिभाऊ राऊत यांचे सहकार्य लाभले. शंकर भामेरे यांनी आभार मानले.
अन् काळाची झडप
छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित सातव्या कुमार साहित्य संमेलनाच्या निवड फेरीसाठी जळगावला जात असतानाच पहूर येथील वाघूर पूलाजवळ आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत बालकवयित्री ज्ञानेश्वरी गतप्राण झाली होती. अशा घटनेला ८ डिसेंबर रोजी १ वर्ष पूर्ण झाले.
या बालकवींचा सहभाग
बालकवी संमेलनात मंथन चौधरी, सोनवणे, गुंजन कासुंदे, जागृती क्षिरसागर, श्रावणी लोहार, विशाखा गायकवाड, गायत्री उबाळे, अविका पनस्कर, गितेश्वरी चौधरी, रिया सटाले, त्रिशा जाधव, मुनिरा शेख, सानिया तडवी, सुजाता देशमुख, भाविका पाटील, वेदिका भामेरे, मोहिनी निकम, प्रणव पाटील, चैतन्या घोंगडे यांच्यासह ६७ बालकवी-कवयित्री सहभागी झाले होते.