साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
नवजात अर्भक मुलीच्या तोंडात तंबाखू कोंबून जीवे ठार मारत पुरावे नष्ट करणाऱ्या नराधम बापाला तात्काळ अटक केल्याबद्दल पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह त्यांच्या पथकाचा जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी नुकताच सन्मान केला.
पहूर येथून जवळील वाकोद येथे गेल्या १२ सप्टेंबर २०२३ रोजी गोकुळ गोटीराम जाधव या ३० वर्षीय तरुणाने त्याची पत्नी भुलाबाई गोकुळ जाधव हिला झालेले नवजात बाळ अर्भक मुलगी असल्याने तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने स्वतः जवळची तंबाखू तिच्या तोंडात भरून तिला झोक्यात टाकून जीवे मारून टाकले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने समाजमन हळहळले होते. ही घटना कोणालाही माहिती होऊ नये, म्हणून त्या नराधम बापाने पुरावाच नष्ट करण्याच्या उद्देशाने त्या पोटच्या चिमुकल्या बालिकेचे प्रेत सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावाच्या शेजारी असलेल्या छोट्या नाल्यात जमिनीत खड्डा करून पुरून टाकले होते. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी तपास पथक तयार करून आरोपीचा तत्काळ शोध घेत गुन्हा उघडकीस आणला व त्यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करत आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. अशा उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक नखाते, चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कवीता नेरकर आदींनी पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड, सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जिजाबराव कोकणे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जीवन बंजारा यांच्या पथकाचा सन्मानपत्र देऊन सन्मान केला.
शेंदुर्णीतील खुनाचा लावला छडा
शेंदुर्णी येथे शेतीच्या वाटणीवरून मारहाणीत झालेल्या खुनाच्या घटनेचा छडा लावल्याच्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक फौजदार शशिकांत पाटील, प्रशांत विरणारे, जिजाबराव कोकणे, विजयकुमार पाटील, संदीप पाटील, प्रशांत बडगुजर यांच्या पथकाला सन्मानपत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नुकत्याच झालेल्या गुणगौरव सोहळ्यात सन्मानित केले. पहूर पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.