धान्य वितरणास मुदतवाढ मिळावी : लाभार्थ्यांची मागणी
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
येथे सप्टेंबर महिन्यातील रेशन मालापासून ५० टक्के लाभार्थी वंचित असल्याने ऐन सणासुदीच्या काळात मनस्ताप करावा लागत आहे. धान्य वितरणासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
जामनेर तहसील कार्यालया अंतर्गत पुरवठा अधिकाऱ्यांकडून पहुर कसबे येथे २८ सप्टेंबर रोजी धान्य उपलब्ध झाले. स्थानिक रेशन धान्य दुकानदारांनी दोन दिवस धान्य वितरण केले. मात्र, १ ऑक्टोबरपासून पॉस मशीनवर सप्टेंबरचे धान्य वितरण बंद झाल्याने सुमारे ५० टक्के लाभार्थी वंचित आहेत. शंभर टक्के लाभार्थ्यांचे धान्य उपलब्ध झालेले असले मुदत संपल्याने लाभार्थी धान्यापासून वंचित असल्याने सप्टेंबर महिन्याच्या धान्य वाटपास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आनंदाचा शिधा मात्र अपुराच
राज्य शासनातर्फे दसरा आणि दिवाळी या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा रेशन दुकानांद्वारे वाटप केला जात आहे. मात्र, हा शिधा ९३ टक्के लाभार्थ्यांनाच दिला जाणार असल्याने उर्वरित ७ टक्के लाभार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य क्रमाने शिधा वाटप होत असल्याने उर्वरित लाभार्थी वंचित राहणार आहेत. त्यामुळे आनंदाचा शिधा १०० टक्के लाभार्थ्यांना देण्यात यावा, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.