साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
गोरगरीब लेकरांसाठी शिक्षणाचे हक्काचे व्यासपीठ आणि गावाचे शिक्षण वैभव असणारी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा ‘मृत्यूशय्येवर’ आहे. त्यामुळे ती शेवटच्या घटका मोजत आहे. शाळेला जगविण्यासाठी संजीवनी देण्याचे कार्य शिक्षकद्वयी करत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठी शाळा खऱ्या अर्थाने गोरगरीब हीन-दीन जनतेच्या लेकरांसाठी शिक्षणाची हक्काची केंद्र आहेत. बदलत्या धोरणांमुळे मराठी शाळांकडे पालकांचा ओढा कमी होत आहे. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्याचे भीषण चित्र निर्माण झाले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ मध्ये जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा सुरू झाली. पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी गावाचे वैभव असणारी जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आज पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ‘मृत्यूशय्येवर’ असलेल्या शाळेला संजीवनी देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मुख्याध्यापक शिवाजी बुधवंत आणि उपशिक्षक राजेंद्र बोडखे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पालक भेटी, उद्बोधन मिळावे, विद्यार्थी-पालक समुपदेशन, पूर्वतयारी अध्यापन अशा विविध उपक्रमांमधून शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळेत शासनाच्या सर्व सुविधा असताना विद्यार्थी मात्र जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत नसल्याने शाळेला अखेरच्या घटका मोजाव्या लागत आहेत. सहावी आणि सातवीचे वर्ग पूर्णपणे बंद पडले आहे. पहिली ते पाचवीपर्यंत अवघे २३ विद्यार्थी आज रोजी शिक्षण घेत आहेत. त्यात पहिलीत तीन, दुसरीत सात, तिसरीत तीन, चवथीत पाच तर पाचवीत पाच अशी पटसंख्या आहे.
समूह शाळा धोरण
शासनाच्या शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे समूह शाळा नावाची संकल्पना गेल्यावर्षी समोर आली. या संकल्पनेनुसार २० पेक्षा कमी पट असणाऱ्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा बनविणे विचाराधीन. २०२१-२२च्या आकडेवारीनुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या १४ हजार ७८३ शाळा राज्यात सुरू आहेत. अशा सर्व शाळांमध्ये एक लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. २९ हजार ७०७ शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या झाली तर पहुर कसबे येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आपले स्वतंत्र अस्तित्व गमावून बसेल.
काय आहे शासकीय धोरण?
पहिली ते पाचवीपर्यंत किमान २१ विद्यार्थी असतील तर २ शिक्षक कार्यरत असतात. २१ पासून ६० विद्यार्थ्यांपर्यंत दोन तर ६१ पासून पुढे तिसऱ्या शिक्षक पदाला मान्यता मिळते.
शिक्षकद्वयींची होतेय पराकाष्टा
मुख्याध्यापक शिवाजी बुधवंत आणि उपशिक्षक राजेंद्र बोडखे हे दोन शिक्षक शाळेत कार्यरत आहे. शाळेत विद्यार्थी संख्या वाढावी आणि टिकून रहावी, यासाठी भर उन्हाळ्यात शाळा पूर्वतयारी अभियानाच्या माध्यमातून त्यांनी पालक भेटी घेऊन समुपदेशन केले. मात्र, ग्रामस्थांची उदासीनता पराकोटीला पोहोचल्याने केवळ चार विद्यार्थी आज पहिलीत केवळ तीन विद्यार्थी दाखल झाले आहेत. शाळा हे गावाचे वैभव असते. ज्या गावातील शाळा संपन्न असतात तेच गाव संपन्न समृद्ध बनते. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा बंद पडणे, हे गावासाठी नक्कीच भूषणावह नसेल, शिक्षणाचा आत्मघात असेल. जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा जगविण्यासाठी माजी विद्यार्थी संघ कार्यरत होणे गरजेचे आहे. माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेला गतवैभव प्राप्त होईल.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष…?
जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकप्रतिनिधींकडून व्यापक स्वरूपात प्रयत्न होताना दिसत नाहीत. शासन-प्रशासन, गावकरी, माजी विद्यार्थी या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून जिल्हा परिषद मराठी शाळा आपले अस्तित्व टिकवू शकते, यात शंका नाही.
शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक प्रयत्न करत आहेत. शाळा टिकविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करेल, असे जामनेरचे गटशिक्षणाधिकारी रामकृष्ण लोहार यांनी सांगितले.
जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा हे आमच्या गावाचे वैभव आहे. शाळा टिकविण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहे. डॉ. जितेंद्र घोंगडे, अनिल जाधव, गुलाब बावस्कर आदींचे सहकार्य मिळत आहे, असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप बाविस्कर यांनी सांगितले.