साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील ओझर येथील २७ वर्षीय तरुणाचा गिरणा नदीतून जात असताना पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १० सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. प्रवीण चुडामण पाटील (वय २७, रा. ओझर, ता. पाचोरा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवीण पाटील हे नेहमीप्रमाणे बाहेर शौचालयाला जात होते. त्याचवेळी ही घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ओझर येथे असलेल्या गिरणा नदी पात्रातून अवैधपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहे. अशाच एका खड्ड्यात प्रवीण पाटील बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा चर्चेतून सूर उमटत आहे.
सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील ओझर येथे प्रवीण पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. ते वेल्डींग दुकानावर काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. प्रवीण पाटील हे नेहमीप्रमाणे १० सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शौचालयाला जाण्यासाठी घरातून निघाले. गावानजिकच्या गिरणा नदीपात्रातून जात असताना त्यांचा पाय घसरला. त्यात ते खाली पडल्याने बुडाले. यावेळी ते पाण्यात पडल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पट्टीतील पोहणाऱ्या तरूणांनी नदीत उडी घेवून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर खासगी रुग्णवाहिकाने पाचोरा शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. मयत प्रवीण पाटील यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ वहिनी असा परिवार आहे.