शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ऐतिहासिक कामगिरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समर्पित टीमने अपघातातील जखमी ३५ वर्षीय रुग्ण पंकज गोपाळ यांच्या जीवघेण्या ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’वर यशस्वीरित्या मात केली. ही दुर्मिळ आणि गुंतागुंतीची स्थिती व्यवस्थापित करणे वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय मानले जाते.
मलकापूर महामार्गावर अपघात झाल्यानंतर दोन्ही मांडीच्या हाडांचे गंभीर फ्रॅक्चर झालेल्या रुग्णास तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते. तपासणीत ‘फॅट एम्बॉलिझम सिंड्रोम’ची तीव्र लक्षणे आढळल्याने रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून बायपॅप व्हेंटिलेटरी सपोर्ट, अँटिकोअग्युलेशन, ऑक्सिजन थेरपी आणि हेमोडायनॅमिक मॉनिटरिंग सुरू केले. तीव्र रक्ताक्षय असूनही डॉक्टरांच्या अचूक देखरेखीमुळे रुग्णाची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर दोन्ही मांडीच्या फ्रॅक्चरची अत्यंत जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. वैद्यकीय टीमने दुहेरी आव्हान यशस्वीरित्या पार पाडले. सध्या रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तसेच सामान्य श्वासोच्छ्वास घेत आहे. यासोबत फिजिओथेरपीच्या मदतीने चालण्यासही सुरुवात केली आहे.
‘जीएमसी’तील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी संपूर्ण उपचारासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी अशा उल्लेखनीय यशाबद्दल अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. पंकज घोगरे, डॉ. सुमित पाटील, डॉ. नितीन प्रजापत, डॉ. विशाल टापरे, डॉ. विरेंद्र पाटील, डॉ. यश बोंडे, डॉ. हनुमंत काळे, डॉ. अमोल कुऱ्हे, डॉ. साईनाथ जगताप, डॉ. तौसिफ सय्यद तसेच भूलतज्ज्ञ विभागप्रमुख प्रा. डॉ. अमित हिवरकर, डॉ. अंजू पॉल, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पाराजी बाचेवार, प्रा. डॉ. नेहा भंगाळे, डॉ. मयूर भोसले, अतिदक्षता विभागाच्या परिचारिका, कर्मचारी अशा सर्वांचे अभिनंदन केले आहे. ह्या यशामुळे जळगाव वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी नोंद झाली आहे. गंभीर वैद्यकीय आव्हानांवर योग्य वेळेत आणि संघटित उपाययोजनेने मात करण्याची क्षमता स्थानिक तसेच राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.



