साईमत, जळगाव : प्रतिनिधी
महानगरपालिकेतील अनुकंपा भरती प्रक्रिया सोमवारी, १५ जानेवारी रोजी पूर्ण करण्यात आली. अनुकंपा प्रतिक्षासूचीत १२५ उमेदवार होते. त्यापैकी १७ इतके उमेदवार विविध कारणास्तव अपात्र ठरले. तसेच १०८ उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यापैकी गट ‘क’ चे ३६ व गट ‘ड’ चे १८ अशा ५४ उमेदवारांना विविध पदांवर सभागृहात आ. राजुमामा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्तीच्या आदेशाचे वितरण करण्यात आले.
वर्ग ३ च्या लिपिक २३, वाहन चालक ५, कनिष्ठ अभियंता स्थापत्य २, कनिष्ठ अभियंता यांत्रिक १, कनिष्ठ अभियंता विद्युत १, रचना सहाय्यक १, स्वच्छता निरीक्षक १, संगणक तंत्रज्ञ १, दुरध्वनी चालक १, व वर्ग ४ च्या शिपाई १४, मेलेरीया कुली २, भालदार चोपदार १, माळी १ याप्रमाणे नियुक्ती आदेशाचे वितरण आ. राजुमामा भोळे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त श्रीमती पल्लवी भागवत, उपायुक्त अविनाश गांगोडे, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापरीक्षक मारुती मुळे, सहा. आयुक्त गणेश चाटे, सहा. आयुक्त अभिजीत बाविस्कर, सहा. आयुक्त श्रीमती अश्विनी गायकवाड, वरिष्ठ लिपिक श्रीमती अर्चना वाणी आदींच्या हस्ते नियुक्त्या दिल्या आहेत.
उर्वरित पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांकडे उपलब्ध पदांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे व काही उमेदवारांकडे शैक्षणिक अर्हता आहे परंतु पद उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पद उपलब्धतेनुसार पुढील टप्प्यात नियुक्ती देण्यात येईल. काही पदावरील नियुक्ती करण्यासाठी महानगरपालिकेने शासनाकडे मार्गदर्शनास्तव प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. प्रस्तावाचा पाठपुरावा आ राजुमामा भोळे यांच्याकडून सुरु आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, असे सांगितले.