Rights Of Journalists : आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी : संदीप काळे

0
24

मान्यवरांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ अन् ‘ग्लोबल महातेज’चे प्रकाशन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

पत्रकार हा समाजाचा कणा आहे. मात्र, आज मीडिया क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. डिजिटल, सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय पत्रकारिता अशा सगळ्या क्षेत्रात नवे ट्रेंड्स, नवी आव्हाने निर्माण होत आहेत. अशा काळात संघटनाशिवाय पत्रकारांचे प्रश्न सोडविणे अशक्य आहे. आमची लढाई पत्रकारांच्या हक्कासाठी आहे, असे संस्थेचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी ठामपणे सांगितले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम संस्थांनी एकत्र येऊन पत्रकारांना जगभर जोडण्याचा आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी नमूद केले. व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचा दोन दिवसीय राज्यस्तरीय केडर कॅम्प अमळनेरच्या मंगलग्रह मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. पत्रकारांना सशक्त करण्यासाठी, त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि बदलत्या मीडिया परिदृश्यात सज्ज करण्यासाठी हा कॅम्प महत्त्वाचा ठरला. राज्यभरातून सुमारे २५० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिबिरात सहभाग नोंदवून व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनात्मक चळवळीला नवी ऊर्जा दिली.

कॅम्पचा समारोप संदीप काळे यांच्या हस्ते झाला. कॅम्पच्या दोन दिवसात पत्रकारितेतील बदलते पैलू, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हाने, संघटनाच्या गरजा आणि व्हॉईस ऑफ मीडिया तसेच व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमने केलेले प्रयोगावर सखोल विचारमंथन झाले. प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी तळागाळातील पत्रकारांना प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखित केली. महिला पत्रकारांचे प्रश्न, स्थानिक पत्रकारांची आव्हाने, डिजिटल युगातील कौशल्ये, आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग, पत्रकारांसाठी आरोग्य विमा व कायदेशीर मदत अशा मुद्द्यांवर ठोस चर्चा झाली.

प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी पत्रकारिता बदलत्या काळानुसार कशी विकसित व्हावी, यावर सखोल विवेचन केले. त्यांनी स्पष्ट केले की, आज पत्रकारिता अनेक पातळ्यांवर बदलत आहे. फक्त वृत्त देण्यापलीकडे जाऊन समाजाच्या विचारांना दिशा देणे, जबाबदार संवाद घडवणे आणि नवे प्रयोग करणे ही काळाची मागणी आहे. पत्रकारितेला नवा आकार देण्यासाठी संघटनात्मक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ मासिक आणि दै. ‘ग्लोबल महातेज’चा प्रकाशन सोहळा पार पडला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष नदवी, कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या शिबिरात संदीप काळे यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी, क्षेत्रीय संघटक आणि मीडिया अभ्यासकांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे उत्कृष्ट नियोजन संयोजक दिगंबर महाले, अमळनेर शाखा व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ कोर टीम महाराष्ट्रने केले. शेवटी आभार संदीप काळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here