साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शासन स्तरावर होणाऱ्या दिरंगाईबाबत पाडळसरे धरणासंदर्भात खा.उन्मेष पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या एक महिन्याच्या अल्टिमेटमनुसार काम न झाल्यास खासदारांसोबत समितीही आंदोलन करणार आहे. मात्र, खासदारांनी शासन प्रशासनाविरोधात आंदोलन न केल्यास जनआंदोलन समितीमार्फत खासदारांच्या दाराशी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला आहे.
पाडळसरे धरणाच्या कामाबाबत व सुधारित प्रशासकीय मान्यता संदर्भात चालढकल व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात खासदार यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धरण जन आंदोलन समितीची महत्त्वपूर्ण बैठक समितीच्या कार्यालयात झाली. पाडळसरे धरणाच्या बाबतीत राज्य शासनाच्या स्तरावर सुधारित प्रशासकीय मान्यता दीर्घ काळापासून प्रलंबित आहे तर हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश व्हावा, यासाठी पाडळसरे धरण जन आंदोलन समिती सातत्याने आंदोलन व पत्रव्यवहार यासह पाठपुरावा करीत आहे. बैठकीत महाराष्ट्र शासन आणि प्रशासनाच्यावतीने पाडळसरे धरणाच्या कामाबाबत व सुधारित प्रशासकीय मान्यता संदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात दिलेली मुदत संपताच खासदार यांनी जाहीर केल्याप्रमाणे आंदोलन करावे. समिती आंदोलनात सहभागी होईल, असे सर्वानुमते ठरले. सुस्त पडलेल्या प्रशासनाविरोधात लोकसभा मतदार संघाचे खासदार या नात्याने जाहीर केलेले आंदोलन न केल्यास मात्र खासदारांच्या दाराशीच जनआंदोलन समिती आंदोलन करेल, असेही समितीच्या बैठकीत ठरले.
बैठकीस समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, रणजित शिंदे, रामराव पवार, महेंद्र बोरसे, एन.के.पाटील, संजय पाटील, जितेंद्र ठाकूर, रियाज मौलाना, महेश पाटील, पुरुषोत्तम शेटे, प्रसाद चौधरी, प्रवीण संदानशिव, सुशील भोईटे, नारायण बडगुजर, दिलीप हातागळे तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
‘उर्वेश’ने मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र
हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून समितीच्यावतीने नुकतेच राज्याचे जलसंपदा तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना. अनिल पाटील, जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना याबाबत पत्रासह ई-मेलने निवेदन पाठवून समितीतर्फे अवगत करून दिले आहे. चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील शेतकरी पुत्र तथा समितीचा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे यांनीही मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून पाडळसरे धरण तातडीने पूर्ण होण्याबाबत मागणी केली आहे. उर्वेश साळुंखेचा आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय समितीने बैठकीत घेतला आहे.