साईमत जळगाव प्रतिनिधी
डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे प्रतिष्ठान व के.सी. ई. सोसायटी शालेय विभाग आणि शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् भगवतगीता पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनातून स्पर्धेचे सलग अठरावे वर्ष असून स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जी.डी बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. गौरी राणे, होत्या तर उद्घाटक म्हणून के.सी. ई. सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीण जंगले होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे सचिव डॉ.अशोक राणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला यज्ञकुंड प्रज्वलित करून ईशस्तवन व स्वागतगीत सादर करण्यात आले. स्पर्धेत शहरी व ग्रामीण गटातून २५०विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे सचिव डॉ.अशोक राणे यांनी प्रास्तविक केले व प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या बौद्ध पौर्णिमा, साने गुरुजी कथामाला आदी कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच श्रीमद् भगवद्गीता म्हणजे जीवन जगण्याची आचारसंहिता असून गुरुशिष्य संवाद आहे तसेच ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म याची सांगळ घातलेली असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्याचे अवलोकन करावे असे आपल्या प्रास्ताविकात संबोधित केले .
उद्घाटक ॲड. प्रवीण जंगले यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 मध्ये नैतिक मूल्य शिक्षण देण्यासाठी श्रीमद् भगवद गीता हा ग्रंथ उपयुक्त असून शिक्षणात समावेश करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. गौरी राणे यांनी याप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्य करीत असताना आलेले अनुभव व डॉ. अण्णासाहेब बेंडाळे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांचे उच्चार, आचार, विचार शुद्ध होण्यासाठी व जीवनाचा भावार्थ समजावा यासाठी गीतेचे श्लोक महत्वाचे असून अण्णा साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच पालकांनी मुलांना मोबाईल पासून परावृत्त करून संस्कारक्षम स्पर्धेत सहभागी केले त्याबद्दल पालकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.
बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी केले. आभारप्रदर्शन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी केले. यावेळी शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शालेय विभागातील सर्वच घटकांनी परिश्रम घेतले.
