साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे विदेशी भाषा आणि संशोधन विषयक प्रमाणपत्र शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
भारतीय आणि विदेशी भाषा जसे की, संस्कृत, उर्दू, इंग्रजी संभाषण कौशल्य, जर्मन, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन भाषा A१ आणि A२ स्तर, मोडीलिपी या शिक्षणक्रमांसोबत लिंग संवेदनशीलता, सायबर गुन्हे आणि कायदा, बौध्दिक संपत्ती हक्क, मानसशास्त्रीय कसोट्या आणि मोजमाप, संशोधन पध्दतीची मूलतत्वे, संशोधनासाठी संबंधित साहित्य आणि ग्रंथसुची लेखन, संशोधन प्रस्ताव लेखन, एसपीएसएसद्वारे संशोधन माहिती विश्लेषण, संशोधन अहवाल आणि पेपर लेखन या प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसाठी प्रवेश सुरू केले आहेत. हे सर्व प्रमाणपत्र शिक्षणक्रम ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे. अनुभवी मार्गदर्शक व विषयतज्ज्ञ उपलब्ध होतील. आठवड्यातून दोन दिवस ऑनलाईन वर्ग होणार आहेत. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी कौशल्यधिष्ठीत शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२५७४९५/४९६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी केले आहे.