चिंचोलीत चोरट्यांचा एकाच रात्री धुमाकूळ

0
17

साईमत लाईव्ह जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोली येथे एकाच रात्रीतून तीन जणांच्या घरातून मोबाईल व एकाच्या घरातून चांदीच्या 5 मूर्तीची चोरी झाल्याची घटना  उघडकीस आली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले  आहे. दरम्यान, या घरांमध्ये चोरी करणारा समाधान गोकुळ सपकाळे (वय 28, रा. एसएमआयटीजवळ,मुक्ताईनगर जळगाव) हा पोलिसांना रात्रीच्या गस्तीत सापडला. त्याच्याजवळ चोरीची दुचाकी मिळून आली.
चिंचोली येथे युवराज भीमराव पवार हे आपली पत्नी मनीषा, मुलगा राहुल, मुलगी सरिता, व सून मनीषा यांच्यासह वास्तव्यासह आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले. मात्र झोपण्यापूर्वी त्यांनी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला. ही संधी साधून चोरट्याने घरात घुसून मोबाईलची चोरी केली. सकाळी उठल्यानंतर मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेजारी राहणारे सुधाकर तुळशीराम वाघ व पलक प्रभाकर पवार, यांचेही मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. याशिवाय तुळशीराम  वाघ यांच्या देवघरातील देवांच्या चांदीच्या पाच मूर्त्या चोरी झाल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिस गस्तीवर असतांना समाधान सपकाळे हा चिंचोली गावात दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यास हटकले व त्याची अंगझडती घेतली त्यावेळी त्याच्याजवळ मोबाईल व चांदीच्या मूर्ती आढळून आल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने चोरीची कबुलीही दिली आहे.
याशिवाय सपकाळे याच्याजवळील दुचाकीदेखील चोरीचीच असल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, उपनिरीक्षक अनिस शेख, सहायक फौजदार अतुल वंजारी, गफूर तडवी, रतिलाल पवार व सिध्देश्वर डापकर यांनी त्याची चौकशी केली असता एकाच वेळी तीन गुन्ह्यांची उकल झाली. चोरीचा मुद्देमालही त्याने काढून दिला. यापूर्वी त्याच्यावर पुणे व जळगाव शहरात चोरीचे दहा गुन्हे दाखल असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here