साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर
येथील नगरपालिका मालकीच्या छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळा क्र.१ महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था शाखा सावदाकरिता पालिकाकडून अधिकृतरित्या भाडेतत्त्वावर संस्थेने घेतला होता. परंतु गाळा पालिका मालकीचा असल्याची संपूर्ण माहिती असूनही गाळा स्वत:च्या नावावर लावण्यासाठी विक्की विजयकुमार आहुजा (रा.जळगाव) यांनी गैरमार्गाने १०० रुपयांच्या दोन स्टॅम्पवर परस्पर तयार केलेली बनावट ताबा पावती व प्रतिज्ञापत्रावर माझी खोटी सही असल्याबाबतचे एक पत्र जून २०१८ मध्ये पतसंस्थेचे अवसायक अशोक डी.बागल यांनी सावदा पालिकेत दिले होते. या पत्रावर (श्री.आहुजा वसुली विभाग याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी) अशी स्पष्ट लेखी टिप्पणी त्यावेळी असलेले मुख्याधिकारी सौरभ द. जोशी यांनी दिलेली दिसत आहे. सावदा पालिकेच्या गाळा क्र.१ प्रकरणी एका आहुजाने दुसऱ्या आहुजाला ‘अभयदान’ दिले असल्याचे एकंदरीत दिसत आहे.
सावदा पालिकेचे तात्कालीन कर निरीक्षक व सध्या भुसावळ पालिकेत कार्यरत अनिलकुमार आहुजा यांनी याबाबत वेळप्रसंगी दखल घेऊन कर्तव्यदक्षपणे चौकशी व कारवाई केली असती तर ६ वर्षांपूर्वीच दोषींवर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा सावदा पोलीस ठाण्यात दाखल झाला असता परंतु कर निरीक्षकांनी पदाचा दुरुपयोग करून गाळा क्र.१ प्रकरणी जाणूनबुजून मौन ठेवून काहीही एक चौकशी व कारवाई न करता थेट विक्की विजयकुमार आहुजा यांच्यासह दोषींना पाठीशी घातल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामळे ‘उलटा चोर कोतवाल को दांटे’ अशी भूमिका घेत गाळा पालिकेने माझ्या ताब्यात द्यावी, यासाठी जळगाव येथील विक्की आहुजा यांनी पालिकेला कोर्टात खेचले.
त्यात पालिकेला वकील लावावे लागले, यासाठी कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत असून वेळ जात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागत असल्यासारखे विपरीत परिणाम नाहक सहन करावे लागत आहे. त्यास तात्कालीन कर निरीक्षक अनिलकुमार आहुजा यांची कुचकामी भुमिका कारणीभूत असल्याचे दिसून येते. या गंभीर प्रकरणी हे सुद्धा दोषी आहे. म्हणून कर निरीक्षक अनिलकुमार आहुजाही या गंभीर प्रकारणात दोषीच्या श्रेणीत येत नाही का? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तसेच विक्की आहुजा यांनी केलेल्या गैरप्रकाराची जून २०१८ पासून पतसंस्थेचे अवसायक अशोक डी.बागल यांना संपूर्ण माहिती असतानाही २०२४ च्या मे महिना अखेरपर्यंत का गप्प बसले होते? याबाबत चर्चेला उधाण आले असून आश्चर्यही व्यक्त होत आहे.
दोषीं विरोधात गुन्हा दाखल करणार : मुख्याधिकारी
गाळा क्र.१ हा पालिका मालकीचा आहे. याबाबत जे गैरप्रकार घडवून आणला आहे. त्या अनुषंगाने पालिकेला तक्रार प्राप्त आहे. यासंदर्भात दोषीं विरोधात लवकरच कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असे उत्तर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावरून मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी दिले आहे. याकडे सर्व शहरवासीयांचे आता लक्ष लागून आहे.