साईमत, पहुर, ता. जामनेर : वार्ताहर
पहुर-एकुलती मार्गावरील लेले नगरात जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ साईडपट्टी सुव्यवस्थित नसल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. यासंदर्भात दै.‘साईमत’ मध्ये ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने भराव टाकून साईडपट्टी दुरुस्त केली. मात्र, आता सूचना फलक कधी लागणार? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे याकडेही जनतेचे लक्ष लागून आहे.
पहूरपासून एकुलतीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. हाच मार्ग पुढे लोहारा गावाकडे जातो. या मार्गावर जिल्हा परिषद उर्दू शाळेनजीक साईडपट्टी सुव्यवस्थित नव्हती. एकीकडून विजेचा खांब तर दुसरीकडून शाळा असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. साईडपट्टी भरली गेली नसल्याने अपघाताची शक्यता होती. मात्र, यासंदर्भात दै.‘साईमत’ मध्ये ठळक मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत साईडपट्टी भराव टाकून व्यवस्थित केली.
‘पुढे शाळा व गाव आहे’, ‘वाहने हळू चालवा’ यासह आवश्यक ते फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेले नाहीत. आता हे फलक कधी लागणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याच परिसरात जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा, मिल्लत उर्दू हायस्कूल यासह चिमुकल्यांची अंगणवाडीही आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन सूचना फलक लावावेत, अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांनी केली आहे.