सोहळ्यात मनोज भालेराव, प्रवीण धनगर यांच्याही उपक्रमांची दखल घेत सत्कार
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिक्षक सेलतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी राष्ट्रपती सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन यांच्या जयंती तसेच शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करुन गौरव सोहळा रविवारी, ७ सप्टेंबर रोजी पार पडला. अध्यक्षस्थानी पक्ष निरीक्षक भास्कर काळे होते. सोहळ्यात ५० पुरस्कार्थी शिक्षकांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला. त्यात मुख्याध्यापक, शिक्षक, कलाशिक्षक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी खेळाडूंचा समावेश होता. याप्रसंगी मनोज भालेराव आणि प्रवीण धनगर यांच्या महाराष्ट्रभर गाजलेल्या उपक्रमांची दखल घेत त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक संजय क्षीरसागर यांनी महाराष्ट्र गीत सादर करुन झाली. त्यांना राजू क्षीरसागर, सागर चौधरी यांनी संगीत सहाय्य केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलीक, प्रशासन अधिकारी खलील शेख, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, प्रमुख वक्ते रामचंद्र पाटील, जिल्हा समन्व्यक विकास पवार, विलास पाटील, प्रभाकर पारवे, संग्रामसिंग सूर्यवंशी, रिजवान खाटीक, अशोक लाडवंजारी, शाम ठाकरे, अजित चौधरी, गोविंदा लोखंडे, गणेश लोडते, तुळशीराम सोनवणे, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
शिक्षकांनी देशाच्या प्रगतीसाठी योग्य भूमिका पार पाडावी
शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करताना प्रमाणिकपणे विद्यार्थी घडवितांना देशाच्या प्रगतीसाठी योग्य भूमिका पार पाडावी, असे मत अध्यक्षीय भाषणात भास्कर काळे यांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या समस्या वाढल्याबद्दलची खंत प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली. शिक्षकाचे कर्तव्य व देशाच्या प्रगतीतील शिक्षकांचे कार्य एजाज मलीक यांनी स्पष्ट केले. शिक्षकाने अध्यापनात आनंद आणला तर अध्यापन प्रक्रिया प्रभावी होऊन विद्यार्थी घडतात, असे मत राम पाटील यांनी व्यक्त केले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष मुश्ताक भिस्ती, पंकज सूर्यवंशी, जिया बागवान, विजय विसपुते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शिक्षक सेलचे महानगराध्यक्ष मनोज भालेराव, सूत्रसंचालन शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष सागर पाटील तर आभार शिक्षक सेलचे उपाध्यक्ष मुश्ताक भिस्ती यांनी मानले.