विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मान्यवरांचे मार्गदर्शन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्या मंदिर आणि प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये नुकताच गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये बालवाडी ते दहावीपर्यंतच्या वार्षिक परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हासह पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रवक्ते मनोज गोविंदवार, विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे, माजी उपशिक्षणाधिकारी निळकंठ गायकवाड उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी गौरव दिनानिमित्त पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन भविष्यातही अशीच प्रगती करावी, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच सचिव सचिन दुनाखे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रगती विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता गोहील तर अहवाल वाचन प्रगती माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी केले.