सोनी नगरातील महादेवाला पंचामृताने सात जोडप्यांच्या हस्ते अभिषेक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने महादेवाची उपासना करून व्रत उपवास करुन त्यांना आपल्या भक्ती आणि श्रद्धेने प्रसन्न केले होते. श्रावण महिन्यात भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. अशातच पिंप्राळा परिसरातील सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर मनोकामना पूर्ती करणारे असल्याने चौथ्या श्रावण सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी भर पावसातही भक्तगण ओलेचिंब होऊन ‘हर हर महादेव’, ‘बोल बम का नारा है, भोले बाबा एक सहारा है…’ असा जयघोष करत भक्तिमय वातावरणात मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी पंचामृताने सात जोडप्यांच्या हस्ते अभिषेक करून पाणी, दूध आणि बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले. त्यानंतर भाविकांच्या हस्ते सकाळी ९ वाजता महाआरती करण्यात आली.
जागृत स्वयंभू महादेव मंदिरात सकाळी ८ वाजता जलाभिषेक, दुग्धाभिषेक, १०८ बेलपत्र त्यानंतर गणपती, महादेवाची महाआरती करण्यात आली. यावेळी ललित-आशा बारी, निलेश-आशा नाथ, सत्यजित-सुवर्णा कंखरे, विपुल-वैष्णवी पवार, दिलीप-वैशाली कोळी, पंकज-ज्योती सपकाळे पंकज-कल्याणी राजपूत अशा सात जोडप्यांच्या हस्ते महादेवाच्या पिंडीवर १०८ बेलपत्र अर्पण करून महाआरती करण्यात आली. आतापर्यंत श्रावण महिन्यानिमित्त चार सोमवारी ५१ जोडप्यांच्या हस्ते महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करण्यात आली.यशस्वीतेसाठी नरेश बागडे, सरदार राजपूत, नारायण येवले, यशवंत पाटील, विकास सूर्यवंशी, सोपान पाटील, माधुरी येवले, संगीता राजपूत, रेखा नाथ, आदींनी परिश्रम घेतले.