जेसीबीच्या साह्याने मिळाले ‘जीवदान’
साईमत/जामनेर/प्रतिनिधी:
शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून अंडर ग्राउंड गटारी, साईड गटारी व कॉलनी भागातील ९ मीटर व १२ मीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. ऐन पावसाळ्यात रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी खड्डे, चिखल पसरला आहे. अशातच धनपुष्प कॉलनीतील साईनाथ नगर भागात काम सुरु आहे. साईड गटारीच्या कामासाठी चाऱ्या खोदून काँक्रीटचे ओतीव काम सुरु आहे. सोमवारी, २ सप्टेंबर रोजी सर्जाराजाचा पोळा सण असल्याने कॉलनीतील शेतकरी नाना चोपडे आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. नाना चोपडे यांनी आपले बैल कॉलनीत असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये चराईसाठी सोडले होते. रविवारी खांदबैलीच्या आणि पोळ्याची तयारी करण्यासाठी त्यांनी आपले बैल घराकडे हाकलले. त्यातील एक बैल गटारीवरून उडी मारून बाहेर निघाला. मात्र, दुसरा बैल उडी मारतांना खड्ड्यात पडला होता.
खड्डा अरुंद असल्याने बैलाला बाहेर निघता येत नव्हते. अशावेळी साईनाथ नगरमधील रहिवाशी सर्जाराजाला बाहेर काढण्यासाठी नाना चोपडे यांच्या मदतीला धावून आले. मात्र, अरुंद खड्डा व बाजूला गटार असल्याने बैलाला बाहेर काढणे जमत नव्हते. त्याचवेळी गटारीचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे जेसीबी त्यांचा सुपर वायझर घेऊन आला. जेसीबीच्या साहाय्याने बैल पडलेल्या खड्ड्याच्या बाजूला दुसरा खड्डा करून बैलाच्या पोटाला दोर बांधून जेसीबीने सर्जाराजाला बाहेर काढून पोळा सणाच्या आदल्या दिवशी ‘जीवदान’ मिळाले. त्याचा आनंद बैलाचे मालक नाना चोपडे यांच्यासह कॉलनीतील रहिवाशांमध्ये ओसंडून वाहतांना दिसून आला.