लोकप्रतिनिधींसह स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, वीरमाता-पितांची राहणार उपस्थिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी होईल. कार्यक्रमाला जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता उपस्थित राहतील. सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी ते ९.३५ वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील सा.प्र.चे तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांनी केले आहे.
विद्यापीठात कुलगुरुंच्या हस्ते होणार ध्वजारोहण
जळगाव : भारताचा स्वातंत्र्य दिन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. समारंभासाठी जळगाव शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिकार मंडळाचे सन्माननीय सदस्य, विद्यापीठ प्रशाळा, विभागचे संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तसेच समारंभ झाल्यानंतर ‘हर घर तिरंगा’ अभियानअंतर्गत विद्यापीठ परिसरात तिरंगा रॅलीसह मानवी साखळीचे आयोजन केले आहे. त्यात विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी होतील.