ओमकार पार्क, बाबुराव नगर परिसर सापडला ‘समस्यांच्या’ विळख्यात

0
6

अमृत योजनेच्या पाईपलाईनच्या गळतीमुळे ‘अस्वच्छ’ पाणी

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

शहरातील पिंप्राळा परिसरातील सावखेडा रस्त्यावरील स्थित ओमकार पार्क, बाबुराव नगर सद्यस्थितीला ‘समस्यांच्या’ विळख्यात सापडला आहे. या भागात प्रवेश करतानाच डाव्या बाजूला पाण्याचा तलाव साचला आहे. त्यात हिरवेगार शेवाळ साचल्याचे चित्र आहे. त्याच बाजूने अमृत योजनेचा पाईपलाईनचा व्हॉल्व आहे. अमृतपाईप जोडणीच्या नटबोल्टमुळे पाईपलाईनमध्ये गळती आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरात पिण्याचे पाणी गढूळ येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही समस्या त्वरित सोडविण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शहरातील ओमकार पार्क, बाबुराव नगरात प्रवेश करतांना गटार आहे. गटारीचा ढापा बुजल्यामुळे गटारीच्या पाण्यामुळे तलाव तयार झाला आहे. पाणी रस्त्यावर येऊन व्हाॅलमध्ये जात आहे. तसेच अमृत योजनेच्या पाईपलाईनमधून गळती होऊन पिण्याचे पाणी नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे लहान मुलांसह अबालवृद्ध आजारी पडत आहे. याकडे संबंधित विभागाने त्वरित देऊन ही समस्या सोडविण्यात यावी, तसेच गटारीवरील ढापा मोठा करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

पथदिव्यांअभावी पसरला अंधार

परिसरात काही ठिकाणी विद्युत खांब आहे. मात्र, पथदिवे नाही. काही ठिकाणी असूनही ते बंदावस्थेत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रात्री येणाऱ्या पादचारी महिलांना परिसरात अंधार असल्याने जीव धोक्यात घालून घरी परतावे लागत आहे. त्यामुळे पथदिवे त्वरित सुरू करण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.

रस्त्यावर ‘खड्डेच खड्डे’

पीपीआरएल अपार्टमेंटकडे जाण्यासाठी ओमकार पार्ककडून जावे लागते. त्यामुळे रस्त्यावर ‘खड्डेच खड्डे’ पडल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करून वाहने चालवावे लागत आहे. पावसाळ्यात तर पाण्याचा तलाव साचतो. त्यामुळे हा रस्ता त्वरित तयार करण्यात यावा, अशीही मागणी होत आहे. परिसरात गटार, रस्ते, पथदिवे अश्या अनेक समस्यांच्या विळख्यात ओमकार पार्क, बाबुराव नगर सापडला आहे. या भागातील समस्या त्वरित सोडविण्यात येण्याची मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here