‘देवदूत’ ठरलेल्या ओमच्या शिक्षणाची जबाबदारी जैन इरिगेशनकडे
साईमत / चोपडा / प्रतिनिधी
अनेर नदीत बुडणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांचे प्राण वाचवणाऱ्या उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय १४) या धाडसी मुलाच्या कार्याला समाजातून मोठी दाद मिळत आहे. ओमच्या या अतुलनीय धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनने त्याच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.
चोपडा तालुक्यातील गणपूर येथील चार मुलं अनेर नदीत आंघोळीसाठी उतरली होती. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने ते बुडू लागले. याचवेळी तेथून जात असलेल्या ओम पाटीलने क्षणाचाही विलंब न करता नदीतील डोहात उडी घेत चारही मुलांना सुरक्षित बाहेर काढले. स्वतःला पोहता येत नसतानाही दाखवलेल्या या अद्वितीय धाडसामुळे ओम त्या मुलांसाठी अक्षरशः ‘देवदूत’ ठरला.
ओम हा गावातील विकास विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेत असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्याचे शिक्षण सुरू आहे. त्याचे वडील रवींद्र पाटील व आई सारलाबाई हे शेतमजूर असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कष्टावर चालतो. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबात मोठा मुलगाही शिक्षण घेत आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येत असतानाच ओमच्या या धाडसाने त्याच्या आयुष्याला नवे वळण दिले आहे.
माध्यमांमधून ओमच्या पराक्रमाची माहिती मिळताच जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तत्काळ त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. जैन इरिगेशन व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून ओमच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला जाणार असून त्याचा लवकरच सन्मानही करण्यात येणार आहे.
यावेळी अशोक जैन म्हणाले की, “संपत्तीपेक्षा मनाच्या मोठेपणाची आज अधिक गरज आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
ओम पाटीलच्या धाडसामुळे चार कुटुंबांवर आलेले संकट टळले असून त्याच्या या पराक्रमामुळे समाजात मानवतेचा जिवंत संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.
