एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील तांबापुरा भागातील हनुमान मंदिर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी, २५ मे रोजी दुपारी १ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रवींद्र विक्रम हटकर (वय ३५, रा. गवळीवाडा, तांबापुरा, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २५ मे रोजी दुपारी १ वाजता रवींद्र हटकर हा त्याच्या घरी असताना संशयित आरोपी आकाश चव्हाण याने जुन्या भांडणाच्या कारणावरून रवींद्रला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने धारदार वस्तूने रवींद्रच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली.
दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जखमी रवींद्रला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता रवींद्र हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश प्रकाश चव्हाण (रा. तांबापुरा) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.कॉ. सचिन पाटील करीत आहे.