न्यू जोशी कॉलनी परिसरात घडली घटना, रुग्णालयात परिवाराचा आक्रोश
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरातील सम्राट कॉलनीतील रहिवासी तरुणाची जुना वाद उफाळल्याने चाकूने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची घटना रविवारी, २७ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. या घटनेत आणखी एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अशा घटनेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, परिसरात तणावाचे वातावरण असून चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे. घटनेतील मयत तरुणाचे धीरज दत्ता हिरवाडे (वय २४) असे नाव आहे. तसेच यात कल्पेश भटू चौधरी (वय २३, रा.सम्राट कॉलनी) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
सविस्तर असे की, शहरातील सम्राट कॉलनीत धीरज हा आई, वडील व बहीणसह वास्तव्यास होता. तो मजुरीचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याचे काही तरुणांसोबत वाद होते.या वादातून २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता न्यू जोशी कॉलनी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ धीरज आणि मारेकरी तरुणांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यावसान होऊन धीरजच्या छातीवर, चेहऱ्यावर, डाव्या हातावर गंभीर वार झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अति रक्तस्त्राव झाल्यामुळे तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.
दोन महिन्यांपूर्वीही धीरजला झाली होती मारहाण
घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांसह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच घटनास्थळी चॉपरचे पाते आढळून आले आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वीही धीरजला मारहाण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा जुना वाद उफाळून आला आहे. त्यात आता धीरजचा खूनच करुन त्याला तरुण मारेकऱ्यांनी त्याचे आयुष्य संपविल्याचा सूर जनमानसातून उमटत आहे. दरम्यान, धीरज हिरवाडेच्या परिवाराने रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.



