Nurses’ Union Holds Protest : वेतन त्रुटी, कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचे घोषणा देऊन आंदोलन

0
31

जळगाव ‘जीएमसी’त १९ जण संपावर, उर्वरित ३०० जणांचे आजपासून कोणत्याही क्षणी बेमुदत कामबंद

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी, १७ रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सर्व परिचर्या संवर्गातील स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन घोषणा देत आंदोलन केले. १९ जुन्या परिचारिकांनी एक दिवसीय कामबंद केले तर शुक्रवारपासून इतर ३०० जणांनी गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. ३०० जणांनी कोणत्याही क्षणी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दुपारी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत शासनाकडे मागण्या पाठविल्या जातील, असे आश्वासन दिले. तसेच संपावर न जाता रुग्णहित लक्षात घेऊन कामावर या, असे आवाहन केले. सातव्या वेतन आयोगातील परिचारिका संवर्गातील वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (संलग्नित मुख्यालय लातूर) १५ व १६ जुलै रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणेसह निदर्शने केली. १७ जुलैला एक दिवसाचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन करण्यात आले. त्याची अजूनही दखल न घेतल्यामुळे १८ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.

शासनाच्या दुर्लक्षामुळे परिचारिका संवर्गात संताप

वैद्यकीय शिक्षण विभागाने ६ जून रोजी परिचारिकांच्या कंत्राटी भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यास राज्यभरातून कडाडून विरोध केला आणि शासन निर्णय रद्द केला. राज्यात वाढत्या लोकसंख्येनुसार १०० टक्के पद निर्मिती करणे, १०० टक्के पदोन्नतीसाठी संघटना शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने परिचारिका संवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. आता शुक्रवारी, १८ जुलै रोजी १९ जण संपावरच राहणार आहे. इतर ३०० कर्मचारी हे १८ जुलैपासून कोणत्याही क्षणी बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना (शासन मान्य) शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावचे अध्यक्ष रुपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी, खजिनदार अक्षय सपकाळे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here