साईमत, नाशिक : प्रतिनिधी
खानपान सेवा (केटरिंग) पुरविण्याच्या व्यवसायात जे पाणी वापरले जाते, त्याचे नमुने तपासून अनुकूल अहवाल देण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणूजीव सहायक वैभव सादिगले यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली आणि अन्य तीन अशा चार संस्थांचा खानपान सेवा पुरविण्याचा व्यवसाय आहे. या चार संस्था खानपान सेव्ोत जे पाणी वापरतात,त्याचे चार नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत आणले गेले होते. याव्ोळी वरिष्ठ अणूजीव सहायक सादिगले याने नमुन्यांचे अनुकूल अहवाल देण्याची तयारी दर्शविली, त्यासाठी शासकीय शुल्का व्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे ५०० रुपये यानुसार चार नमुन्यांचे एकूण दोन हजार रुपये लाच मागितली. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला.तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारत असताना सादिगले यास पकडण्यात आले.त्याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिरा आदामाने करीत आहेत.