साईमत लाइव्ह जळगाव प्रतिनिधी
शिवसेनेसोबत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे ४० आमदार गळाला लावले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर शिंदे गटाने भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. यावर शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी संजय राऊतांवर टीकेची तोफ डागली.
आम्ही शिवसेनेतच आहोत, पण नासक्या भाजीबद्दल काही बोलणार नाही, अशा शब्दात पाटील यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
बंडखोरांनी काय ते एक कारण सांगावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आम्ही शिवसेना (Shiv Sena) वाचवण्यासाठी हाउठाव केला आहे. आम्ही बंडखोर नाहीच, आम्ही शिवसेनेतच आहोत. उलट आम्ही शिवसेना वाचवतोय, त्यासाठी आम्ही मंत्रिपदे सोडली, कुणी मायचा लाल ग्रामपंचायतचं सरपंचपद सोडत नाही, असे पाटील म्हणाले.
आम्ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरोधात नाही. आजही आम्हाला ते आदराचे आहेत. कोण माणूस शुक्राचार्य आहे तो तुम्हाला माहिती आहे, त्याने आमच्या पक्षाचा सत्यानाश केला, असा टोला पाटील यांनी राऊतांना लगावला आहे.