नवी दिल्ली : वृत्तसंस्था
यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.अमेरिकेचे शास्त्रज्ञ पियरे अगोस्तिनी, जर्मनीचे फेरेन्स क्रॉज आणि स्वीडनच्या ॲनी एल. हुईलर यांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे.
या तीन शास्त्रज्ञांनी अशी उपकरणे विकसित केली आहेत,ज्याद्वारे ॲटोसेकंदात इलेक्ट्रॉनचे जग पाहता येईल. ॲटोसेकंद म्हणजे १/१,०००,०००,०००,०००,००० वा भाग. याद्वारे त्यांनी ब्रम्हांडाचे वय शोधून काढले.ब्रह्मांडाचे वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यांपर्यंत अनेक गोष्टींसाठी अगोस्तिनी, क्रॉज आणि हुईलर यांचे संशोधन कामी आले आहे.
ॲनी एल. हुईलर यांनी १९८७ मध्ये एक निरीक्षण नोंदवलं की, जेव्हा नोबल गॅसमधून इन्फ्रारेड लेजर लाईट टाकली जाते, तेव्हा प्रकाशाचे अनेक ओव्हरटोन दिसतात. प्रत्येक ओव्हरटोनची वेगळी सायकल आहे. जेव्हा एखाद्या वायूच्या अणूंवर प्रकाश पडतो तेव्हा असे घडते. त्यामुळे अणूंच्या इलेक्ट्रॉन्सना ऊर्जा मिळते. त्यामुळे ते अणू प्रकाशित होतात.
तर पियरे अगोस्तिनी यांनी २००१ मध्ये प्रकाशाशी संबंधित एक प्रयोग केला. या प्रयोगाद्वारे त्यांना इलेक्ट्रॉन्सचे जग समजून घेता आले. इलेक्ट्रॉन्सवर अशा प्रकारचा प्रयोग याआधी कोणीच केला नव्हता. हा प्रयोग करताना त्यांनी ॲनी एल. हुईलर यांच्या प्रयोगांचाही आधार घेतला. इलेक्ट्रॉन्सचं जग समजून घेणं, त्यांच्या हालचाली पाहणं, त्यांची चमक आणि ऊर्जा समजून घेणं अवघड काम आहे.आपण जसजसं यावर संशोधन करत जाऊ तसतशी भविष्यात अत्याधुनिक इलेक्ट्रॉन उत्पादनं विकसित करता येतील. इलेक्ट्रॉन नियंत्रित कसे करायचे, ॲटोसेकंद तंत्रज्ञानाच्या मदतीने रेणू ओळखणे हे खूप मोठे संशोधन आहे. वैद्यकीय निदान करण्यात याची मदत होणार आहे.