रक्ताळलेल्या अवस्थेत जखमी तरुणाचा पोलीस ठाण्यात ठिय्या
साईमत /जळगाव/प्रतिनिधी : –
जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला असून, कौटुंबिक वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर घडलेल्या थरारक घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला एक तरुण थेट जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोहोचला आणि “जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत पोलीस ठाण्याच्या प्रांगणातच ठिय्या मांडला.
अशी घडली घटना :
सत्यजित गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्याच्याच जवळच्या नातेवाईकांनी सत्यजितवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या हाताला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. मात्र, उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात जाण्याऐवजी न्यायाच्या अपेक्षेने सत्यजितने थेट पोलीस ठाणे गाठले.
पोलीस ठाण्यात ‘हायव्होल्टेज ड्रामा’ :
रक्ताने माखलेल्या अवस्थेत सत्यजित पोलीस ठाण्यात दाखल होताच उपस्थित पोलीस कर्मचारी व नागरिक क्षणभर अवाक झाले. आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी त्याने जोरदार आरडाओरडा करत ठाण्याच्या प्रांगणातच ठिय्या दिला. सत्यजितच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांच्या दहशतीमुळे आणि तीव्र संतापामुळे तो दवाखान्यात न जाता थेट पोलिसांकडे दाद मागण्यासाठी आला होता.
प्रकृती खालावली, नातेवाईकांची मध्यस्थी :
बराच वेळ रक्तस्राव सुरू असल्याने सत्यजितची प्रकृती हळूहळू खालावू लागली. शुद्ध हरपण्याच्या अवस्थेत असूनही तो उपचारासाठी ठाम नकार देत होता. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नातेवाईकांनी मध्यस्थी करत त्याला जबरदस्तीने ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पोलीस कारवाई सुरू :
या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात कौटुंबिक वादाचे हिंसक वळण आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांकडून लवकरच आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
