महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
साईमत/पारोळा/प्रतिनिधी :
तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये अतिवृष्टी सदृश्य मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस, मक्का, सोयाबीन, ज्वारी, केळी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामा करावा, एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांना दिले.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाईचे पंचनामे करताना कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करावे, त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलेले असेल, अशाच शेतकऱ्यांचा आम्ही पंचनामे करू, असे दिसून येत आहे. परंतु पाऊस जाऊन मोठा कालावधी लोटला. सद्यस्थितीत कोणत्याही क्षेत्रामध्ये पाणी साचलेले दिसून येत नाही. परंतु अतिवृष्टीमुळे कापसाचे बोंड सडून झाडावरचे शिल्लक थोडेफार बोंडही गळून झाड पुर्णपणे लाल झाले आहे. त्यामुळे त्याची ग्रोथ होईल, असे कोणतीही परिस्थिती नाही. कापसाचे पिक जास्तीत जास्त २० दिवसाचे शिल्लक राहिल्याची परिस्थिती त्या झाडांची आहे.
तरीही शासनाने सरसकट पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत.सरसकट पंचनामा करत नसाल तरी अडचण नाही परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतात खरंच नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांचा पंचनामा झाला पाहिजे, एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित न राहता हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी भुराजी कांडेकर, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, महेंद्र पाटील, पिनू पाटील, भगवान पागरे, भगवान पाटील, नथू पाटील, संदेश पाटील, निंबा पाटील, विजय पाटील, महेंद्र पाटील, लखीचंद पाटील, दीपक पाटील, वसंत पाटील, सुभाष पाटील, दगा पाटील, कारभारी पाटील, योगेश पाटील, मच्छिंद्र पाटील, बन्सीलाल पाटील, संजू पाटील, राजेंद्र पाटील, श्याम पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह शिवरे, आडगाव, तरवाडे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शेतशिवारात वन्य प्राण्यांचा वावर अति वाढून त्यांच्या त्रासाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यांना शेती करणेही अवघड झाले असून याबाबत वनविभागाने योग्य ती उपाययोजना करून त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणीही तहसीलदार डॉ.देवरे यांना यावेळी निवेदनाव्दारे करण्यात आली. प्रत्युत्तरात तहसीलदार डॉ.देवरे यांनी नुकसान भरपाई व वन्य प्राण्यांच्या प्रश्नांसंदर्भात सकारात्मकता दाखवत शासन स्तरावरून दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.