सलग चौथ्या टर्मसाठी सज्ज आ.सावकारे यांच्याविरोधात उमेदवार सापडेना

0
21

विवेक ठाकरे, साईमत, जळगाव :

भारतातल्या मोठ्या रेल्वे जंक्शनपैकी हे एक, आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड, दोन आयुध निर्माण कारखाने व जवळच दीपनगर येथील एक औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ही ओळख असलेल्या भुसावळ विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विजयी झालेले आ. संजयभाऊ सावकारे यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील एक नशिबवान राजकीय माणूस म्हणून पाहिले जाते. येत्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची सर्वदूर इच्छुकांची तयारी सुरु असतांना आ.संजय सावकारे अगदी बिनधास्त आहेत. कारणही तसेच आहे येथे भाजपाकडून त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असतांना महाविकास आघाडीत ही जागा कुणाला सुटते हे सुद्धा स्पष्ट नसून गेल्या वेळेच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार सद्यातरी कुणी दिसून येत नाहीय, हे विशेष !

भुसावळ विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी भाजपचे आ.संजयभाऊ सावकारे यांच्या विरोधात अपक्ष दंड थोपटलेल्या डॉ.मधुताई राजेश मानवतकर आणि राष्ट्रवादीचे जगनभाई सोनवणे या प्रमुखांत तिरंगी लढत झाली होती. संजयभाऊ सावकारे ८१ हजार ६८९ मते मिळवत सलग तिसऱ्यांदा येथून आमदार झाले होते. त्यांचे प्रमुख विरोधक अपक्ष डॉ.मधुताई मानवतकर यांना २८ हजार ६७५ तर राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले जगनभाई यांना केवळ २० हजार २४५ मतांवर थांबावे लागले होते.एकूणच ५३ हजार १४ मतांनी आ.सावकारे विजयी झाले होते. त्यामुळे त्यावर्षी दोघेही उमेदवार त्यांच्यापुढे फिके पडल्याचा निकाल दिसून आला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सद्यातरी डॉ. मानवतकर यांची तयारी दिसत नाहीय. तथापि संविधान रक्षणाच्या उद्देशाने स्थापन विविध संघटना सोबत घेऊन चालणारे, पुरोगामी विचाराची भूमिका असणारे आणि आंदोलन पुरुष म्हणून ओळख असलेले जगनभाई सोनवणे हे पुन्हा विधानसभेच्या मैदानात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. येथील माजी आ.संतोषभाऊ चौधरी हे त्यांच्या बाजूने राहतील का किंवा इतर दुसरा उमेदवार पुढे करतील याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा आहेत.

आ.सावकारे यांचा करिष्मा चौथ्यादा चालेल ?

भुसावळ शहराचे शिल्पकार म्हणून त्यावेळी जनमाणसात लोकप्रिय झालेले तत्कालीन आ. संतोषभाऊ चौधरी यांचे स्वीयसहाय्यक असलेले आ. सावकारे राजकीय नशीब घेऊन आलेले नेते आहेत.२००८ मध्ये पुनरचनेत भुसावळ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संजूभाऊ यांच्या गळ्यात राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारीची आणि आमदार म्हणून विजयाची माळ पडली. राज्याचे परिवहन राज्यमंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून भुसावळ मतदारसंघातून निवडणूक लढवून ते दुसऱ्यांदा तर २०१९ मध्ये सलग तिसऱ्यांदा आमदार झाले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४१ हजार ४१० मतांची आघाडी भाजपाला मिळाली असल्याने आगामी निवडणुकीसाठी त्यांच्यासमोर आव्हानच नसल्याने त्यांचा चौथ्यादा करिष्मा चालेल असेच सध्या तरी चित्र आहे.

भला माणूस, प्रतिमा अबाधित

आ.सावकारे यांना भुसावळ मतदारसंघात एक निगर्वी, शांत, संयमी आणि महत्वाचे कुणालाही त्रासदायक नसलेल्या लोकप्रतिधीनी म्हणून पसंत केले जाते. दगडापेक्षा वीट मऊ… म्हणून त्यांना सर्वच समाजाने डोक्यावर घेतले आहे. भुसावळ मतदारसंघात शहरात पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल आहेत. रस्त्यांचा प्रश्‍न आहे. मंजूर झालेली एमआयडीसी काहीही उपयोगी ठरली नाही. दळणवळणाचे मोठे साधन असतांना मतदारसंघात ठोस काम नाही. आपल्या पंधरा वर्षाच्या काळात ट्रामा सेंटर, क्रिडांगण, प्रशासकीय इमारत, जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस उपधीक्षक कार्यालय अशी काही बोटावर मोजण्या इतकेच कामे त्यांच्या नावावर आहेत तरीही ते सलग निर्विवाद लोकांच्या मनातील सावकार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here