‘‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एक्सपोर्टर’’ पुरस्काराने नितीन गावंडे सन्मानित

0
17

साईमत जळगाव प्रतिनिधी

डाळ उद्योग, चटई उद्योग, पाईप व ड्रिप उद्योग अशा विविध उद्योगांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव गगनभरारी घेत असतांना आता स्मार्ट फार्मास्युटिकल्सने जळगावचे नाव फार्मा क्षेत्रातसुद्धा गाजवले आहे. लघु उद्योग क्षेत्रातील फार्मा मधील शासनाच्या ‘‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एक्सपोर्टर’’ हा पुरस्कार एक नव्हे दोन नव्हे तर सलग ४ वर्षांसाठी म्हणजे सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ साठीचा हा पुरस्कार स्मार्ट फार्मास्युटिकल्सने प्राप्त केला आहे.

पुणे येथे नुकतेच झालेल्या समारंभात राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत, यांच्या हस्ते तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदींच्या उपस्थितीत हॉटेल टिपटॉप येथे हा पुरस्कार स्मार्ट फार्मास्युटिकल्सचे नितीन गावंडे यांनी स्वीकारला. सुवर्णपदक, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

केमिकल इंजिनीयर आणि बिझीनेस मॅनेजमेंट ग्रॅज्युएट असलेले नितीन गावंडे यांनी सांगितले की, मी स्वतंत्र ओळख व अस्तित्व निर्माण करण्याच्या आत्मविश्‍वासामुळे नामांकित फार्मा कंपन्यांमधील उच्चपदाची नोकरी सोडून आपल्या गावी म्हणजे जळगावला परत आलो. अतिशय प्रतिकुल आणि खडतर प्रवासानंतर सन २००६ साली स्मार्ट फार्मास्युटिकल्स्‌ची सुरुवात जळगावमध्ये केली. आपल्या उद्यमशीलतेने आपल्या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊन जळगावची औद्योगिक प्रगतीत आपलाही अल्प वाटा असेल या उद्देशाने स्मार्ट फार्माची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. औषधी क्षेत्रात नजीकच्या भविष्यात क्रांतीकारी ठरणारे पेपटाईड – API बनविणार्‍या मोजक्याच कंपनीमध्ये स्मार्ट फार्माची गणना होते.
स्मार्ट फार्मास्युटिकल्स्‌मध्ये औषध उद्योगाला लागणारा कच्चा माल तयार करित असून आमच्या एकूण उत्पादनापैकी साधारणत: ७५ ते ८०% हे आम्ही निर्यात करीत असतो. आमच्या उत्पादनाची उच्च गुणवत्ता, उत्कृष्ट दर्जा, अद्ययावत संशोधन आणि विकास व आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मशिनरी, निर्धारित वेळेवर मालाचा पुरवठा, अशा अनेकविध कसोट्यांवर खरे उतरल्यामुळे अमेरिका, न्युझिलंड, तुर्कस्तान, युरोप, व्हिएतनाम, साऊथ आफ्रिका आदिंसह ५० ते ६० देशांमध्ये स्मार्ट फार्माच्या उत्पादकांची मागणी असल्याचे नितीन गावंडे यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमाणित तसेच ड्रग मास्टर फाईल असलेली आमच्या स्मार्ट फार्माच्या सर्व सहकारायांच्या समर्पणाने, विदेशातून अधिकाधिक परकीय गंगाजळी देशात आणल्यामुळे हा सन्मान प्राप्त झाल्याची भावना नितीन गावंडे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पुरस्कार स्विकारतांना नितीन गावंडे यांचे सोबत त्यांच्या पत्नी सारिका तसेच चिरंजीव स्नेहिन व कन्या अनिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here