नवीदिल्ली : वृत्तसंस्था
२००५ ते २००६ या कालावधीत झालेल्या लहान मुलांच्या हत्यांनी नोएडा हादरले होते. निठारी हत्याकांड हे प्रकरण प्रचंड गाजले होते. या प्रकरणात मुख्य संशयित सुरिंदर कोली आणि त्याचा सहकारी मोनिंदर सिंह पंढेर या दोघांनाही कोर्टाने दिलासा दिला आहे. १२ प्रकरणार सुरिंदरला तर दोन प्रकरणात मोनिंदरला दिलासा दिला आहे. या दोघांची फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे.
ट्रायल कोर्टाने या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र आता अलाहाबाद कोर्टाने ही शिक्षा रद्द केली आहे. जस्टिस अश्विनी कुमार मिश्रा आणि जस्टिस सय्यद आफताब हुसैन रिझवी यांच्या पीठाने या प्रकरणी या गेल्या महिन्यात निकाल राखून ठेवला होता.
सुरिंदर कोलीला १२ प्रकरणात तर पंडेरला २ प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. जी अलाहाबाद कोर्टाने रद्द केली आहे. निठारी हत्याकांड हे २००५ ते २००६ च्या दरम्यान घडले होते. डिसेंबर २००६ या महिन्यात नोएडातल्या एका घराजवळच्या नाल्यातून अनेक सांगाडे आढळून आले होते. या प्रकरणात मोनिंदर सिंह आणि सुरेंद्र कोली या दोघांना अटक करण्यात आली. तसेच दोघांविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला होता.
कोर्टाने काय म्हटले आहे?
अलाहाबाद कोर्टाने या प्रकरणात असे म्हटले आहे की, या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे ठोस पुरावे आणि साक्षीदार नाहीत. त्यामुळे आम्ही दोषींना दिलासा देत आहोत. अलाहाबाद कोर्टाचा हा निर्णय म्हणजे सीबीआयसाठी मोठा झटका मानला जातो आहे.
निठारी हत्याकांड नेमकं काय
२००५ ते २००६ या कालावधीत निठारीमध्ये असे हत्याकांड झाले ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. सुरेंद्र कोली आणि मणिंदर सिंह या दोघांच्या कोठी बाहेरच्या नाल्यातून अनेक सांगाडे आढळून आले होते. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा कळले की मुलांचे अपहरण केले जात होते. हे दोघेही या मुलांना ठार करुन त्यांचे मांस खात होते असाही संशय आहे.
