राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची पदस्थापना
साईमत/यावल/प्रतिनिधी
राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याचा आदेश शासनाचे अवर सचिव अ.का.लक्कस यांनी बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी काढला आहे. त्यानुसार यावल नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त गट ‘ब’ चे निशिकांत गवई यांची पदस्थापना केली आहे.
आदेशात नमूद केले आहे की, जुम्मा कासम प्यारेवाले यांची तुमसर येथे तसेच अमोल बागुल (एरंडोल), श्रीमती विजया घाडगे (शेवगाव, जि. अहमदनगर), श्रीकांत लाळगे (लोहा, जि.नांदेड), निशिकांत गवई (यावल), रामनिवास झवर (धरणगाव), सचिन पूदाके (बिलोली, जि.नांदेड), सुरज जाधव (जळगाव जामोद, जि.बुलडाणा), अंबादास गर्कळ (मुक्ताईनगर), अविनाश गांगोडे (नवापूर, जि.नंदुरबार), सचिन बच्छाव (मुरुड जंजिरा, जि.रायगड) याठिकाणी मुख्याधिकाऱ्यांची पदस्थापना केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पदावर रुजू होण्याचे आदेश
नियुक्तीचे आदेश तात्काळ अंमलात येतील. सर्व अधिकाऱ्यांनी पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू व्हावे, तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा. तसेच आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून पदस्थापनेत बदल करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २३ चे उल्लघंन करणारी असल्यामुळे ती गैरवर्तणूक समजून त्यांच्याविरुध्द शिस्तंभगविषयक कारवाई करण्यात येईल, त्याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच त्यांच्याविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मधील तरतुदींनुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, त्याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.