शिक्षणशास्त्र व अध्यापक विद्यालयात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्सव; ‘झेप’ अंकाचे थाटात प्रकाशन
साईमत चोपडा प्रतिनिधी
राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारधारेचा वर्तमान पिढीला महत्त्व पटवून देणारा जिजाऊ–विवेकानंद जयंती कार्यक्रम प्रताप विद्या मंदिराच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला.
मुख्य वक्ते पंकज शिंदे यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले, “राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांच्या रूपाने स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकारले, तर स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा डंका सातासमुद्रापार नेला. आजच्या पिढीला त्यांच्या कर्तव्याची आणि विचारांची नितांत गरज आहे.”
कार्यक्रमात शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रजनी सोनवणे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील, तसेच डॉ. सविता जाधव, सुजय धनगर, महेंद्र पटेल, योगिता बोरसे व संजय देशमुख यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे अध्यापक विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रकाशित होणाऱ्या ‘झेप’ अंकाचे थाटात प्रकाशन. मीनल पाटील यांनी अत्युत्कृष्ट लेखन सादर केले, तर प्रशिक्षणार्थी शिक्षक प्रितेश महाजन, माधुरी चौधरी, जुईली ठाकरे, निकिता धनगर आणि दीक्षा शिरसाट यांनी अभ्यासपूर्ण मनोगताद्वारे दोन्ही महापुरुषांचे अभिवादन केले.
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या ‘झेप’ अंकाचे कौतुक करत सांगितले, “जिजाऊंचे धाडस आणि विवेकानंदांची एकाग्रता अंगीकारल्यास विद्यार्थी जीवनात नक्कीच यशस्वी होतील.”
कार्यक्रमाची सुरुवात देवयानी धनगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सामूहिक ईशस्तवनाने झाली. दीक्षा शिरसाट आणि समूहाने सुश्राव्य स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार शोएब शेख यांनी मानले. या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि भावी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ जिजाऊंचे धाडस आणि विवेकानंदांची एकाग्रता समजून घेण्याची संधी नाही, तर राष्ट्रनिर्मितीच्या आदर्शांकडे वळण्याचे संदेशही मिळाले.
