साईमत/ न्यूज नेटवर्क । अमळनेर ।
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीतर्फे भाजपा सत्तेत आल्यास ते बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलवून टाकतील, असा नारा दिला गेला. त्यासाठी दलीत, मुस्लिम कार्ड खेळले गेले तर भाजपाने ‘चारसो पार’ हा नारा दिला. त्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड खेळले गेले. मात्र, निवडणुकीत ‘संविधान’ आणि ‘हिंदुत्व’ हे मुद्दे कोठेच दिसले नाही, असे परखड विचार साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले. अमळनेरातील साने गुरुजी विद्यालयात प्रागतिक समविचारी संघटना-संस्था समन्वय मंचच्या उत्तर महाराष्ट्र स्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संयोजक तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पाटील होते.
बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल येथील समाजवादी नेत्या उल्का महाजन उपस्थित होत्या. बैठकीत जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक येथील सुमारे ५० संघटना, संस्था सहभागी झाल्या होत्या.
संयोजक अविनाश पाटील यांनी कार्यक्रमाची भूमिका आणि आगामी विधानसभा निवडणुकीविषयी सविस्तर मांडणी करून काँग्रेस लोकसभेच्या वेळेस बरीच उदास राहिली. तिने तिचे उदासिकरण नाही सोडले तर पक्षास मोठा फटका बसू शकतो, असे विचार व्यक्त केले. बैठकीत खलील देशमुख, सतीश सुर्वे, फाईम पटेल, शाम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. अशोक पवार यांनी केले.