चाळीसगाव महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपप्राचार्य डी.एल.वसईकर यांचे प्रतिपादन
साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी
प्रत्येक घरात ज्याप्रमाणे देवघर असते, त्याप्रमाणे प्रत्येक घरात एक ग्रंथ घर असावे. वाचनाने व्यक्ती सुसंस्कृत आणि प्रगल्भ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची उदाहरणे देवून डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या पंचसुत्रीचे स्पष्टीकरण करून ग्रंथालय आणि वाचनाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविली गेली पाहिजे,
असे प्रतिपादन उपप्राचार्य डी.एल. वसईकर यांनी केले. येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात भारतरत्न, मिसाइल मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे होते.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन करावे. वाचनाने आपला शब्द संग्रह वाढतो, ज्ञानात भर होते. आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालय समृद्ध आहे. त्यात कथा, ललित लेख , चरित्र – आत्मचरित्र, व्याख्याने अशी अनेक प्रकारची पुस्तके आहेत. ती पुस्तके विद्यार्थ्यांनी वाचली पाहिजे. त्याबरोबरच इतिहास भूगोलाची पुस्तके वाचावी. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढण्यास मदतच होईल. आपल्या जीवनात मोठ्या व्यक्तींचे आदर्श ठेवून त्यांच्याप्रमाणे आपणही वाचन करावे, असे अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे म्हणाले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही. बिल्दीकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपप्राचार्या. डॉ. के. एस. खापर्डे, डॉ. दिपाली बंस्वल, प्रा. अंकुश जाधव, प्रा. एम. व्ही. चिंचोले, प्रा. हर्षदा पाटील, आणि विद्यार्थी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी कैलास बागुल, नरेंद्र देशमुख, बी. के. जगधने, एन.एम. अमृतकर, मोहिनी मासरे, हर्षाली सोनवणे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. अर्चना कुलकर्णी, सूत्रसंचलन सहायक ग्रंथपाल नितीन अहिरे तर आभार सचिन जाधव यांनी मानले.