जिल्ह्यात आवश्‍यक आरोग्य सुविधा व्यापक स्वरुपात राबवाव्यात

0
18

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

रेडक्रॉसचे सेवा कार्य हे जळगावच्या प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे ही जबाबदारी पार पडणे गरजेचे आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी आपापल्या परीने वेळ देऊन जळगाव जिल्ह्यात आवश्‍यक असलेल्या आरोग्य सुविधा व्यापक स्वरुपात राबवाव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले. रेडक्रॉसच्या वार्षिक सर्व साधारण सभेत ते बोलत होते.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी भवनात नुकतीच उत्साहात झाली. रेडक्रॉसचे संस्थापक सर हेनरी ड्युनंट यांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीपप्रज्ज्वलन करून रेडक्रॉस गीत सादर करण्यात आले. कार्यकारिणी सदस्य शांताताई वाणी यांच्या शब्दांत दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी यांनी मागील वर्षाचे इतिवृत सभेसमोर सादर केले. त्यास सभेने एकमताने मंजुरी दिली. तसेच मागील वर्षभरात रेडक्रॉस राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली व राज्य शाखा मुंबई यांच्यामार्फत प्राप्त झालेल्या सर्व साहित्याबाबत माहिती दिली. रेडक्रॉस रक्त केंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्तकेंद्राचा वार्षिक कामकाजाचा कार्य अहवाल सादर केला.

नोडल ऑफिसर घनश्‍याम महाजन यांनी रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व त्या माध्यमातून रेडक्रॉस करीत असलेले कार्य प्रगतीचा आढावा सादर करत भविष्यातील उपक्रमांबाबत माहिती दिली. रेडक्रॉसच्या ज्युनियर व युथ रेडक्रॉस समितीच्या चेअरमन डॉ. अपर्णा मकासरे यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर स्थापन केलेल्या ज्युनियर व युथ रेडक्रॉस शाखांबद्दल माहिती देऊन युवकांना प्रोत्साहित करण्याच्या विविध प्रकल्पांबाबत सभेला माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली.

उपाध्यक्ष गनी मेमन यांनी संपूर्ण वर्षभरातील सर्व सामाजिक उपक्रमाची विस्तृत माहिती दिली. त्यात प्रामुख्याने अहवाल वर्षात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा फायदा घेण्याबाबत आवाहन केले. आर्थिक वर्ष २०२२-२०२३ चे अंकेक्षित नफा तोटा पत्रके व ताळेबंद, पुढील वर्षाचे उत्पन्न खर्चाचे अंदाज पत्रक तसेच ऑडिटरची नेमणूक करून त्यांचा मेहनताना ठरविणे हे सर्व विषय कोषाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी सादर केले. उपस्थित सर्व सभासदांनी रेडक्रॉसच्या सर्व सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, लेखापाल महेश सोनगिरे, संजय साळुंखे, सहाय्यक मनोज वाणी, योगेश सपकाळे, राहुल पाटील, समाधान वाघ, शीतल शिंपी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा तर कार्यकारिणी सदस्य विजय पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here