परिसरात पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय तयारी जोरात सुरू आहे.
साईमत/ यावल/प्रतिनिधी :
तालुक्यातील दहिगाव गण मतदारसंघातून यावल पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ.यशश्री देवकांत पाटील यांची उमेदवारी ठरल्याची माहिती समोर आली आहे. दहिगाव गण हा महिला सर्वसाधारण आरक्षण असलेला मतदारसंघ असून परिसरात पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय तयारी जोरात सुरू आहे.
यशश्री देवकांत पाटील या छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनच्या सचिव आणि यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्या आहेत. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रीडा आणि महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबवले असून, निराधार समितीच्या माध्यमातून गरीब, विधवा, अनाथ, ज्येष्ठ नागरिक व अपंग नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्या आहेत.
यशश्री पाटील यांनी तालुकास्तरावर वैद्यकीय दाखले मिळविण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गरजू लोकांना मिळावा, यासाठी शिबिरे आयोजित करून पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्यात पती ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांचेही मोलाचे सहकार्य असून हे दाम्पत्य पदवीधर, प्रामाणिक आणि समाजाच्या सुखदुःखात सहभागी राहणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. ग्रामस्थांमध्ये आणि विविध क्षेत्रातील नागरिकांमध्ये सौ. यशश्री पाटील यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असून, त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जातो. नागरिकांनी म्हटले आहे की, लोकहितासाठी समर्पित आणि विकासाचे स्वप्न सत्यात उतरवू शकणारी महिला म्हणजेच सौ. यशश्री देवकांत पाटील.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अशा पात्र आणि जनसेवाभावी महिलेला संधी मिळावी, अशी जनतेची अपेक्षा असून, यशश्री पाटील यांनीही दिलेल्या संधीचा फायदा करून स्थानिक विकास आणि जनतेच्या हितासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.