विरोधी पक्षनेतेपदावरून काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचीही नाराजी, जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेने कोणतीही…”

0
16

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकासआघाडीत नाराजीनाट्य सुरू आहे. शिवसेनेने वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांची नियुक्ती केल्यानंतर काँग्रेसने आपल्याशी कोणतीही चर्चा न केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. आता याबाबत विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच शिवसेनेने निर्णय घेताना कोणतीही चर्चा केली नसल्याचं सांगितलं.

जयंत पाटील म्हणाले, “शिवसेनेने इतर दोन पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर ते अधिक चांगलं दिसलं असतं. मात्र, त्यांनी अशी चर्चा केली नाही. राष्ट्रवादीने पत्र देण्याआधी बाळासाहेब थोरातांशी थोडी चर्चा केली होती. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे त्यांचा विरोधी पक्षनेता होतो अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे. असं असलं तरी विरोधी पक्षनेता नेहमीच इतरांचाही पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतो.”

“विधानसभेत सर्व पक्षांनी नंतरच्या काळात पाठिंबा दिला. विधान परिषदेत निवड करत असताना मित्रपक्षांना विचारलं गेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर तीन ते चार सदस्यांचाही पाठिंबा होता,” असंही जयंत पाटलांनी नमूद केलं.

शिंदे-फडणवीस सरकारवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, “सत्तेवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं अवैध सरकार आलंय. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करत आहोत. नाना पटोले काय म्हणाले हे मला माहिती नाही. त्यामुळे पटोलेंना उत्तर देणं मला आवश्यक वाटत नाही.”

“शिवसेना अधिकृत पक्ष आहे. त्या पक्षाचा प्रतिनिधी कामगाज सल्लागार समितीवर असणं स्वाभाविक होतं. ते का टाळलं हे लक्षात येत नाही, पण आता विरोधी पक्षांचं सर्व नेते विधानसभेच्या अध्यक्षांकडे गेले आहेत,” अशी माहिती जयंत पाटलांनी दिली.

“मराठवाड्यावर गोगलगाईचं मोठं संकट”

“राज्यात पूरग्रस्त जनतेची अधिक बिकट स्थिती आहे. त्यांच्या मदतीला सरकार अद्याप गेलेलं नाही. अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. गोगलगाईचं मोठं संकट मराठवाड्यातील शेतीवर आलं आहे. गोगलगाईंनी ५-१० एकरचे प्लॉट उद्ध्वस्त झालेत,” असंही पाटलांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here