साईमत, जामनेर : प्रतिनिधी
शहरातील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव तथा जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते माता सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी नगर परिषदेच्या माजी नगरसेविका शितल सोनवणे, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, एकलव्यचे मुख्याध्यापक देविदास काळे उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेच्या सचिव साधना महाजन यांना वैष्णवी बेलदार या ११वी सायन्सच्या विद्यार्थिनीने ना. गिरीष महाजन आणि साधना महाजन यांचे स्केच फोटो काढून भेट देण्यात आले.
कार्यक्रमात शारदीय उत्सवात विद्यार्थिनींनी विविध देवीच्या रांगोळी, निबंध स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवून दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. शेवटी विद्यार्थी व विद्यार्थिनींना संस्थेच्या सचिव साधना महाजन, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते बक्षीसासह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्राचार्यांनी शारदीय नवरात्र उत्सवाचे महत्त्व व शक्तिपीठाची महतीबाबत मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका शितल पाटील यांनी केले.