नाट्यसंमेलनात होणार ‘नाट्यकलेचा जागर’

0
13

साईमत जळगाव प्रतिनिधी

या वर्षी अ भा मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे नाट्य संमेलन साजरे होत आहे. हे संमेलन संपुर्ण महाराष्ट्रात एकुण ९ ठिकाणी साजरे होत असुन त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर “नाट्यजागर” सुध्दा होत आहे. हा नाट्य जागर साठी महाराष्ट्रातील 22 केंद्रांवर होणार असुन, त्यातील एक केंद्र “जळगाव” आहे.

रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या या ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजनानिमित्त जळगावा जिल्हा मराठी नाट्य परिषदेतर्फे एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्य संगीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

के.सी.ई.सोसायटीचे एम.जे.कॉलेज नाट्यशास्त्र विभाग, आय.एम.आर. जळगाव व कान्ह कला केंद्र यांच्या सहकार्याने जळगाव केंद्रावरील या सर्व स्पर्धा दि. २६ जानेवारी ते २फेबवारी पर्यत चालणार आहेत. त्याचे सर्व टाईमटेबल अ भा मराठी नाट्य परिषदेच्या वेबसाईट वर जाहिर झाले आहे. दिनांक २६, दि.२७ जानेवारीला बालनाट्य स्पर्धा तर दि २८ जानेवारीला एकपात्री स्पर्धा के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत.
दि.२६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता या बालनाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन होणार असून, पहिल्या दिवशी भाग्यदीप थिएटर्स, तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय चाळीसगाव यांची २, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल, के.सी.ई. सोसायटीचे ए.टी. झांबरे माध्य. विद्यालय या संघांची ५ बालनाट्ये सादर होणार आहेत. दि. २७ जानेवारी रोजी एकूण १० बालनाट्ये सादर होणार असून, यात ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी, काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, रावसाहेब रुपचंद विद्यालय, नाट्यरंग थिएटर्स, न्यू इंग्लीश स्कूल साक्री, जि. धुळे, खान्देश नाट्य प्रतिष्ठान, शेठ ला.ना. सार्व. विद्यालय, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ, अनुभूती निवासी शाळा शिरसोली, रामचंद्र चितळे माध्य. विद्यालय देवपूर धुळे या १५ संघांचा समावेश आहे.

यानंतर दि २८ जानेवारीला एकपात्री तर दि. २फेबवारीला नाट्यवाचन आणि नाट्य छटा स्पर्धा एम. जे. कॉलेजमध्ये आणि एकांकिका स्पर्धा आय. एम. आर. मध्ये होणार आहे. जळगाव केंद्रावर जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे येथील एकुण ८७ संघ आपले सादरीकरण करणार आहेत.

या स्पर्धेला जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी उपस्थिती देवून, बालकलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना.भारंबे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे आणि उपाध्यक्ष अँड संजय राणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here