जी. एच. रायसोनी महाविद्यालयात सरदार पटेलांना अभिवादन
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षीचा कार्यक्रम “सरदार @१५०-एकता मार्च (एक भारत, आत्मनिर्भर भारत)” या थीमनुसार आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.
राष्ट्रीय एकता दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून आपल्या देशातील विविधतेतून एकता जपण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्याचा दिवस असल्याचे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत उपस्थित होते. त्यांनी सरदार पटेलांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना एकात्मतेच्या विचाराने प्रेरित राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रीय एकता दिन’ तसेच ‘विकसित भारत’ या संकल्पनांवर प्रतिज्ञा घेतली. तसेच ‘एकता मार्च’ काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत “एक भारत-स्वावलंबी भारत” संदेशाचा प्रसार केला.
यावर्षी ‘सरदार @१५०’ उपक्रमांतर्गत रायसोनी महाविद्यालयात शांतता, न्याय आणि सशक्त संस्था या उद्दिष्टाशी सुसंगत विविध उपक्रमांचे आयोजन ६ नोव्हेंबर ते ३१ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘विकसित भारत – युवा नेत्यांशी संवाद’, रील स्पर्धा आणि निबंध स्पर्धा उपक्रमांचा समावेश असेल. सर्व उपक्रमांची माहिती आणि सहभाग ‘माय भारत पोर्टल’ वर नोंदविण्यात येणार आहे.
यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक
कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा. अक्षय पाटील आणि प्रा. सुवर्णा सराफ यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुनील रायसोनी यांनी सर्वांचे कौतुक केले. प्रास्ताविक प्रा. वसीम पटेल, सूत्रसंचालन तथा आभार प्रा. अमोल जोशी यांनी मानले.



