५३७ प्रकरणांचा निपटारा; १७ लाखांपेक्षा अधिक रकमेची वसुली
साईमत/बोदवड/ प्रतिनिधी
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत ५३७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तर १७ लाख ३५७ रुपये इतकी वसुलीही झाली. यामुळे पक्षकारांना त्वरित न्याय मिळाला तसेच न्यायालयावरचा कामाचा ताण कमी झाला.
तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील यांनी कार्यक्रमात बोलताना लोक अदालतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, लोक अदालत खऱ्या अर्थाने ‘जन अदालत’ ठरली आहे. वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रकरणांमुळे होणारा मानसिक त्रास व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ही सर्वोत्तम आणि एकमेव व्यवस्था आहे. लोक अदालत त्वरित न्याय देऊन दुभंगलेली मने जोडते. वाद मिटवा आणि आयुष्यात पुढे चला. लोक अदालतीमुळे तन, मन आणि धनाचे नुकसान टाळता येते.
राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन एपी खोल्लम यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. के. एस. इंगळे यांनी केले. तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, सरकारी वकील दिलीप वळवी तसेच अनेक स्थानिक वकील बंधूंनी सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे पक्षकारांना न्याय मिळवण्यात मदत झाली.
महसूल विभाग, तलाठी व नायब तहसीलदार बी.डी.पाटील, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, विस्तार अधिकारी, राष्ट्रीयकृत बँक, सेंट्रल बँकेचे दुर्वेश पांडे, स्टेट बँकेचे मॅनेजर श्री.देसाई तसेच वीज महामंडळाचे कर्मचारी वर्ग कार्यक्रमास उपस्थित होते. न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे, कर्मचारी प्रशांत कुमार बेदरकर, श्रीराम भट, एस.एस.खेडकर, एस.के.बेलदार, शिपाई वाय. ओ. वंजारी, राजू धुंडाळे तसेच केस वॉच यांनी या यशस्वी आयोजनात मोलाचे सहकार्य केले.लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी प्रकरणांसह दाखलपूर्व दाव्यांचा मोठ्या प्रमाणावर निपटारा झाला. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता वाढली आणि त्वरित न्याय मिळवून देण्यात एक आदर्श उदाहरण साकारले गेले.
