राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याची खुर्ची, कपाट जप्त
जळगाव (प्रतिनिधी) –
पारोळा येथील शेतकऱ्याची शेती महामार्गात गेल्यामुळे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतीचे दर कमी दिल्याने शेतकऱ्याचा १२ वर्षांपासून वाढीव मोबदला मिळावा म्हणून लढा सुरू होता. जळगाव दिवाणी न्यायाधीश यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या विरुद्ध निकाल दिल्यानंतर खुर्ची जप्तीचे आदेश केले होते. त्यानुसार ५ मे रोजी दुपारी अधिकाऱ्यांची खुर्ची व कपाट कार्यालयात जाऊन जप्त करण्यात आले.
नवाब खाटीक (रा. मोंढाळे ता. पारोळा) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरुद्ध दावा दाखल केला होता. २०११ साली अधिसुचना प्रसिद्ध झाली होती. २०१३ साली अमळनेर प्रांत कार्यालयात निवाडा मंजूर झाला होता. मात्र त्यात रस्त्यात शेतीचे दर कमी दिल्यामुळे नवाब खाटीक यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे वाढीव मोबदला मिळावा याकरिता २०१५ साली अर्ज दाखल केला होता.
२०२२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दावा मंजूर केला होता. या अपिलाविरुद्ध ‘नही’ने जळगाव येथील प्रमुख सत्र न्यायाधीश यांचेकडे अपील दाखल केले. २ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यायालयाने ते फेटाळले. नतर नवाब खाटीक यांनी दिवाणी न्यायालयात न्या. शरद परदेशी यांचेकडे वाढीव मोबदला व दिलासा रक्कम आणि व्याज मिळावे म्हणून दरखास्त दाखल केली होती. आता न्यायालयाने निकाल दिला असून ‘नही’ च्या प्रकल्प अधिकाऱ्यांविरुद्ध जप्ती वॉरंट आदेश जारी केला.
त्यानुसार ५ मे रोजी दुपारी नवाब खाटीक व त्यांचेतर्फे वकील ॲड. कुणाल पवार व सहकारी हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या शिव कॉलनी भागातील कार्यालयात पोहोचले. तेथे अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निकालाची प्रत दाखवून खुर्ची व कपाट जप्त करून कार्यवाही पूर्ण केली. नवाब खाटीक यांच्यावतीने ॲड. कुणाल पवार यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. कल्पेश पाटील, ॲड. अश्विनी गिरासे, ॲड. ए. के. मोरे, ॲड. सुरेश महाजन, ॲड. जयप्रभा भोईटे, ॲड. शैलेश ठाकूर यांनी सहकार्य केले.